जयंत धुळप, अलिबागपोलादपूर तालुक्यातील दिवील गावात गतवर्षी निष्पन्न झालेल्या वाळीत प्रकरणातील आरोपी दिवील तंटामुक्त गाव अध्यक्ष अनिल भिलारे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर भिलारे, सहदेव देवे, नरेश चांडवीलकर, सहदेव कुशिमकर, चंद्रकांत चांडवेकर यांच्यासह २३ जण जामिनावर सुटून आल्यावर त्यांनी अन्य ग्रामस्थांना सोबत घेऊ न आमच्या १६ जणांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. गावात सातत्याने अडवणूक, जाच, शिवीगाळ करून मारण्याची धमक्या देत असल्याने आम्हाला गावात राहणे अशक्य झाले आहे. गावकीच्या या पंच-पुढाऱ्यांच्या सततच्या जाचाला कंटाळून आम्ही कु टुंबीय सामूहिक आत्मदहन करण्याच्या मनस्थितीत आहोत. तरी या आमच्या तक्रार अर्जाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारा अर्ज प्रियंका प्रकाश देवे यांनी शुक्रवारी रायगड जिल्हा पोलीस प्रशासनास दिला आहे.तक्रारदार वाळीतग्रस्त प्रियंका देवे यांच्या भावाची मुलगी राजश्री हिचे दिवील गावातील नितीन देवे याच्यासोबत लग्न झाले; परंतु त्यांच्यातील मतभेदांमुळे त्यांची सोडचिठ्ठी (घटस्फोट) झाली. त्यानंतर राजश्री हिचे लग्न प्रियंका प्रकाश देवे यांचा पुतण्या जनार्दन देवे याच्यासोबत दिवील गावातच झाले. राजश्रीचे पहिले पती नितीन देवे यांनीदेखील दुसरे लग्न केले. सर्वकाही व्यवस्थित सुरू असतानाच राजश्री हिने गावातच दुसऱ्या मुलासोबत लग्न करून राहू नये, असा निर्णय गावकीच्या पंचपुढाऱ्यांनी घेतला. त्यांनी या प्रकरणी ७० हजार रुपये दंड ठोठावला. दंड भरण्यास प्रियंका प्रकाश देवे यांनी नकार दिला असता, संपूर्ण कुटुंबास वाळीत टाकले. या वाळीत काळात पंचपुढाऱ्यांकडून वेगवेगळे त्रास देऊन सतत अडवणूक करण्यात येत आहे. अलीकडेच सहदेव देवे यांनी मला मारहाण करून शिवीगाळ केली. प्रियंका देवे, पती प्रकाश देवे, माझी मुलगी प्रगती देवे, मुलगा मनीष देवे, प्रथमेश देवे, आयुष देवे, माझे दीर नारायण मनू देवे, जाऊबाई कुंदा नारायण देवे, पुतण्या जनार्दन देवे, सून, भाची राजश्री व तिचा मुलगा स्वरूप, दुसरे दोन पुतणे दिनेश देवे व राकेश देवे तसेच माझे मोठे दीर पांडुरंग देवे, जाऊबाई लक्ष्मीबाई पांडुरंग देवे व त्यांची मुलगी हेमा देवे अशा कुटुंबाला वाळीत टाकले आहे.
पोलादपूरमध्ये वाळीतग्रस्तांचा छळ सुरूच
By admin | Published: January 26, 2016 1:50 AM