अंबरनाथ - अंबरनाथमध्ये फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक यांच्यावर पोलिसांची 'वक्रदृष्टी' पडली आहे. कारण मागील ४ दिवसात पोलिसांनी रहदारीला अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत तब्बल ४० फेरीवाले आणि रिक्षाचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर देखील शिवाजी महाराज चौकातील फेरीवाल्यांची मुजरी मात्र किंचितही कमी झालेली नाही.
अंबरनाथमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक हा शहराचा केंद्रबिंदू आहे. रेल्वे स्टेशनबाहेरचा हा प्रमुख चौक असल्याने येथे नेहमीच पादचारी, वाहनचालक यांची गर्दी असते. त्यात फेरीवाले आणि रिक्षाचालक यांचीही चौकात गर्दी असते. मात्र बऱ्याच वेळा थेट अर्धा रस्ता अडवून फेरीवाले बस्तान मांडून बसलेले असतात. तसेच रिक्षाचालकही बेशिस्तपणे रिक्षा रस्त्यात लावून उभे राहतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत मोठी भर पडते. यामुळे पोलिसांची डोकेदुखी मात्र सतत वाढत राहते. याच कारणाने पोलिसांनी हे फेरीवाले आणि रिक्षाचालक यांच्यावर धडक कारवाई सुरू केली आहे. मागील ४ दिवसात पोलिसांनी तब्बल ४० गुन्हे दाखल केले आहेत. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अंबरनाथ शहरातले फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक चांगलेच धास्तावले आहेत. मात्र चौकातील त्यांचे बस्तान आजही कायम आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांची कारवाई अजून कठोरपणे करणे गरजेचे आहे.