- राजू ओढे, ठाणेहायटेक गुन्हेगारी जगताचा बिमोड करण्यासाठी पोलीस यंत्रणाही अधिकाधिक सक्षम करण्याचा विडा ठाणे पोलिसांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर उचलला आहे. याशिवाय खाकी वर्दीचा कारभार जास्तीतजास्त लोकाभिमुख करण्याचे लक्ष्यही ठाण्याच्या पोलीस यंत्रणेने डोळ्यासमोर ठेवले आहे.गुन्हेगारी जगताकडून तंत्रज्ञानाचा होत असलेला दुरुपयोग दिवसागणिक वाढत चालला आहे. ठाण्यात उघडकीस आलेले खंडणीखोर कॉल सेंटरचे प्रकरण हे त्याचेच द्योतक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार झपाट्याने होत असून, सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही त्याच वेगाने वाढत आहे. ठाण्याचे सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी याबाबत चिंता व्यक्त करताना, हे गुन्हे हाताळण्यासाठी सायबर सेल सर्वांगाने सक्षम करण्याची गरज अधोरेखित केली. पोलीस यंत्रणेची त्यादिशेने वाटचाल सुरु आहे. सायबर सेल्सना पोलीस ठाण्यांप्रमाणे सक्षम करणे हे नववर्षातील सर्वाधिक महत्वाचे काम राहील, असे त्यांनी सांगितले. पोलीस यंत्रणा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी विविध पातळीवर सध्या प्रयत्न सुरु आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये जनसुविधा केंद्र सुरु करण्यात आली असून, येणाऱ्या काळात ती आणखी सक्षम करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु आहेत. पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदाराचे काम या केंद्रांमार्फत सोपे केले जाईल. सोशल मिडियाचा वापर सर्वत्र वाढत आहे. त्याअनुषंगाने फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्अॅप आदींचा वापर आणखी सक्षमपणे करून नागरिकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जाईल. शालेय विद्यार्थ्यांना पोलीस यंत्रणेचा कारभार समजावा, यासाठी पोलीस ठाण्यांना भेटीचा कार्यक्रम करण्याचा मानस डुंबरे यांनी व्यक्त केला. गुन्हे उघडकीस आणणे, शहराच्या कानाकोपऱ्यातील माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवणे, तसेच पोलीस आणि नागरिक यांच्यात दुवा म्हणून काम करणे अशी महत्वाची भूमिका पोलीस मित्र बजावत असतात. भविष्यात ही संकल्पना आणखी सक्षमपणे राबविण्याचा निश्चयही त्यांनी व्यक्त केला. लैंगिक अत्याचार पिडितांसाठी ‘मासूम’लैंगिक अत्याचाराने पिडित अल्पवयीन मुला-मुलींची तपास प्रक्रियेदरम्यान मानसिक गैरसोय होते. पोलीस ठाण्यांमधील वातावरणामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे या पिडितांसाठी ‘मासूम’ नावाचा वेगळा कक्ष वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात लवकरच सुरु केला जाणार आहे.शिस्तीचे पालन करणाऱ्या चालकांना ‘थँक यू’यंत्रणा लोकाभिमुख व्हावी, यासाठी शिस्तीचे पालन करणाऱ्या वाहन चालकांना ‘थँक यू नोट’पाठविण्याचा उपक्रम वाहतूक शाखेने हाती घेतला आहे. ‘थँक यू इंडिया’ या संस्थेच्या मदतीने हा उपक्रम सुरु आहे. ही संस्था शिस्तप्रिय वाहनचालक हेरुन त्यांच्या घरी अशा प्रकारचे आभारपत्र पाठवते असे आशुतोष डुंबरे म्हणाले.
पोलिसांची वाटचाल हायटेक यंत्रणेकडे
By admin | Published: January 01, 2017 3:47 AM