ठाणे - महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील 606 शेतकऱ्यांकडून काजूचे डबे खरेदी करण्याच्या बहाण्याने करोडोचा गंडा घालून पसार झालेल्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या यूनिट 1 ने जेरबंद केल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यानी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
आरोपींकडून 1109 काजुगराचे डबे आणि 58 लाख 7 हजारांची रोकड तसेच दोन कोटी 20 लाख 31 हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. बनावट व्यापारी कंपनी स्थापन करून मोठ्या प्रमाणात कोल्हापूर व कोकण परिसरातील शेतकऱ्याचा माल खरेदी करून त्याचे पैसे न देता ही टोळी पसार झाली होती. या प्रकरणी ठाण्याच्या कापुरबावडी पोलीस ठाण्यात 27 नोव्हेंबर 2018 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितिन ठाकरे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने सुरुवातीला गुजरात इथून दीपक पटेल याला डिसेंबर 2018 रोजी अटक केली. त्या पाठोपाठ आठ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.