लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्यासाठी ठाण्यातील उपवन परिसरात आलेल्या नरेंद्र गुरव (३९, रा. गावठाणवाडी, सिंधुदुर्ग) आणि अजित मराठे (३३, रा. पिंपळवाडी, सिंधुदुर्ग) या दोघांना ठाणेवनविभागाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून बिबट्याचे कातडेही हस्तगत करण्यात आले आहे.उपवन भागातील हवाईदल केंद्राजवळील बस थांब्याच्या ठिकाणी दोघेजण बिबट्याच्या कातडयाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाण्याच्या वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहायक वनसंरक्षक डी. एम. दहिबावकर यांच्या मार्गदर्शनाखाली येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार, येऊरचे परिमंडळ वनअधिकारी सुजय कोळी, विकास कदम, रमाकांत मोरे, संजय साबळे आणि राजन खरात आदींच्या पथकाने २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास या बस थांब्याजवळ साध्या वेशात सापळा लावून नरेंद्र आणि अजित या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांच्याही हालचाली संशयास्पद होत्या. त्यांच्याकडील बॅगेच्या झडतीमध्ये बिबट्याचे कातडे आढळून आले. हे कातडे त्यांनी वैभववाडी (सिंधुदुर्ग) येथून आणल्याची कबुली दिली. त्यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियमानुसार तसेच वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक वनसंरक्षक दहिबावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असल्याचे वन विभागाने सांगितले.