भिवंडी १८ : कानपूर येथील रूग्णालयांत मृत झालेल्या आईचा मृतदेह भिवंडीला आपल्या घरी आणून मृतदेहावर वेळीच अंत्यसंस्कार न करता मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्याने मुलास अटक केली आहे. त्या मृतदेहावर वडपा येथील मुलाच्या जागेत आज सोमवार रोजी सायंकाळी सव्वाचार वाजता पोलीसांच्या साक्षीने मुलाने अंत्यसंस्कार केले.
शहरातील ब्राम्हणआळीत भाग्यश्री अपार्टमेंटमध्ये विकास गोयंका आपल्या आईसह रहात होता.तो आईस घेऊन कानपूर येथे गेला असता त्याची आई शांतादेवी विश्वनाथ गोयंका(८०)ह्या अचानक आजारी झाल्याने त्यांना कानपूर येथील रिजेन्सी हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.तेथे मंगळवार दि.१२ सप्टेंबर१७ रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.त्यांचा मृतदेह विकासने रेल्वेमधून दादर येथे आणला व दादर येथील रूग्णवाहिकेतून हा मृतदेह शहरातील ब्राम्हणआळीतील भाग्यश्री अपार्टमेंटमध्ये शनिवार रोजी रात्री आणला.मात्र त्या मृतदेहावर वेळीच अंत्यसंस्कार न केल्याने परिसरांत दुर्गंधी पसरल्याने सोसायटीच्या लोकांनी काल रविवारी रात्री पोलीसांत तक्रार केली.तक्रारीची दखल घेत पोलीसांनी शांतादेवीचे पार्थिव इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांच्या शवगृहात ठेवले आणि मृतदेहाची अवहेलना केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून पोलीसांनी विकास गोयंका यांस ताब्यात घेतले.
तालुक्यातील वडपा गावांत विकास गोयंका याची स्वत:ची जागा असुन त्याच्या सांगण्यानुसार त्याच्या वडीलांवर देखील तेथेच अंत्यसंस्कार केले होते.त्यामुळे त्यास आईवर देखील तेथेच अंत्यसंस्कार करण्याची त्याची इच्छा होती.त्यानुसार आज सोमवार रोजी सायंकाळी सव्वाचार वाजता पोलीसांच्या साक्षीने विकासने त्याची आई शांतादेवीच्या पार्थिवास मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.अंत्यविधा आटोपल्यानंतर मृतदेहाच्या विटंबना प्रकरणी पोलीसांनी त्यास अटक केली असुन त्यास कोर्टात हजर करणार असल्याचे पोलीस सुत्राने सांगीतले.या प्रकरणी विकास गोयंका याने दोन दिवस पोलीसांना व परिसरांतील लोकांना वेठीस धरले होते.आज अंत्यसंस्कार केल्यानंतर सर्वांनी सुस्कारा सोडला.