मीरारोड - मीरा भाईंदर , वसई विरार पोलीस आयुक्तालयातील दोघा पोलिसांनी एका पोलीस कर्मचाऱ्याकडून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम आणि वैद्यकीय देयक मंजुरीसाठी दिड हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर एका पोलिसाला अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक संजय पवार ( ४६ ) व लिपिक गणेश वाघेरे (३२) ह्या दोघांकडे पोलीस कर्मचाऱ्यांची वेतन फरक रक्कम, वैद्यकीय देयक आदीचे प्रस्ताव तयार करून ते कोषागार कार्यालयात सादर केली जातात. एका पोलीस कर्मचाऱ्याने या दोघां कडे सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळणे करिता तसेच वैद्यकीय बिल मंजुरीकरिता अर्ज देऊन पाठपुरावा चालवला होता.
मात्र पवार आणि वाघेरे ह्या दोघं पोलिसांनी त्या अर्जदार पोलीस कर्मचाऱ्याकडे देयक कार्यालयात सादर करण्याकरिता दीड हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडे तक्रार केली होती. पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे व अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नवनाथ जगताप यांनी पर्यवेक्षण अधिकारी म्हणून काम पाहिले.
लाचेची मागणी केल्याचे आढळून आल्याने पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास सह अमित चव्हाण, सखाराम दोडे यांच्या पथकाने मंगळवारी पोलीस आयुक्तालयातून वाघेरे ह्याला अटक केली. तर पवार याचा शोध पोलीस घेत आहेत . या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.