ठाणे : कोपरी परिसरात खंडणी उकळणाऱ्या कृतिक उर्फ बंटी सीतापराव (१८, रा. पारशेवाडी, कोपरी, ठाणे) याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस अंमलदारावरच चॉपरने हल्ला करण्याची धमकी देऊन धक्काबुक्की केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी कृतिक याला अटक केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली.
कृतिक याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात चार दिवसांपूर्वी खंडणी उकळल्याप्रकरणी तसेच हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यात त्याला अटक करण्यासाठी कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार नितीन चव्हाण हे कोपरी येथील जिजामाता उद्यानाजवळील गल्लीमध्ये गेले होते. त्या वेळी त्याने अटक टाळण्यासाठी कमरेला बांधलेला चॉपर काढून तो हवेत फिरवत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात त्याला प्रतिकार करताना कृतिक याने चव्हाण यांना धक्काबुक्की करून सरकारी गणवेशाचे बटन तोडून शर्टही फाडला. या प्रकरणी चव्हाण यांनी कोपरी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे आणि भारतीय हत्यार कायद्याखाली ६ मार्च रोजी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धोंडे आणि पोलीस उपनिरीक्षक एच. एम. वाघमारे यांच्या पथकाने त्याला ७ मार्च रोजी अटक केली आहे.