ठाणे : बाजारपेठेतील एका दुकानामध्ये चोरी करण्यासाठी शिरलेल्या सागर चव्हाण (३०) आणि ललीत जमादार (३६) या दोन चोरटयांना ठाणेनगर पोलिसांनी बुधवारी रंगेहाथ पकडले. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.बाजारपेठेतील खेमा गल्लीमध्ये २१ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.३० ते ४.३० वाजण्याच्या सुमारास ‘मुलोबा’ या दुकानाचे शटर उचकटून या (ठाण्यातील लक्ष्मीनगर, चिरागनगर भागात राहणा-या ) दोघांनी आत शिरकाव केला. त्यांनी दुकानातील कपडे आणि काही ऐवजही चोरला होता. त्याचवेळी ठाणेनगर पोलीस ठाण्याचे बिट मार्शल पोलीस नाईक असिफ तडवी तसेच शोध पथकाचे (डीबी) प्रविण बांगर आणि तुषार जयतकर यांनी दुकानाचे शटर उचकटलेले पाहून सागर आणि ललीत या दोघांनाही रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून चोरीतील मालही हस्तगत केला. त्यांच्याविरुद्ध चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. बाजारपेठेतील दुकान फोडण्यापूर्वी त्यांनी राबोडीतील अन्य एका दुकानातूनही सुमारे पाच हजारांचा ऐवज चोरला होता. राबोडीनंतर त्यांनी बाजारपेठेतील खेमा गल्लीतील दुकान फोडले आणि गस्तीवरील पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडून चोरीचे आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. राबोडी पोलीसही या दोघांचा ताबा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.