ठाणे, दि. 4 - जेवणाचे बिल देण्यावरून उद्भवलेल्या वादातून कळवा पोलीस ठाण्याचा हवालदार प्रवीण संख्ये याने एका बारच्या मॅनेजरसह तिघांना मारहाण केल्याची घटना २७ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याच घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरू असतानाच या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला. याची गंभीर दखल घेऊन संख्ये याला निलंबित करण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस उपायुक्त डी.एस. स्वामी यांनी दिले आहेत.दीड दिवसाच्या गणरायाच्या विसर्जन बंदोबस्तानंतर संख्ये हा त्याच्या काही सहकाऱ्यांसह कळव्याच्या सायबा बारमध्ये जेवणासाठी २६ आॅगस्ट रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास बसला. जेवण झाल्यानंतर वेटरने त्यांच्या बिलामध्ये अन्य टेबलावरील पोलिसांचे बिलही त्यात मिळवून दिले. त्यांच्याकडे दोन हजार २०० रुपयांचे हे बिल सोपवण्यात आले. इतरांचे बिल आमच्या बिलामध्ये का दिले, असा संख्ये यांनी वेटर जयेनकुमार पुयी, मॅनेजर प्रेम पुजारी आणि खजिनदार लोकेश घेवाडिया यांना जाब विचारला. त्यावर पोलीस लोग ऐसे ही कन्सेशन माँगते है, कभी आधाही बिल भरते है, असे मॅनेजरने टोमणे मारण्यास सुरुवात केली. याचाच राग आल्याने संख्येने वेटर, मॅनेजर आणि कॅशिअर या तिघांनाही मारहाण केली. या मारहाणीची तक्रार बारचे चालक उमेश करकेरा यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. बागवान यांच्याकडे केली. याच तक्रारीच्या प्रती कळव्याचे सहायक आयुक्त, उपायुक्तांसह हॉटेल असोसिएशनकडे दिल्या. या तक्रारीची पोलिसांकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा आरोपही करकेरा यांनी केला. ४ आॅगस्टला या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होताच उपायुक्त स्वामी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संख्येला चौकशीच्या अधीन राहून तडकाफडकी निलंबित केले, तर उर्वरित सहा कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू केली आहे.‘‘बारमालक करकेरा यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात कळवा पोलीस ठाण्याचे हवालदार संख्ये हे हॉटेलमधील मॅनेजरसह तिघांना मारहाण करताना आढळले. त्यामुळेच त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर, उर्वरित सहा जणांची चौकशी सुरूकेली आहे. २२०० रुपयांचे हे बिल असून ते त्यांनी अदाही केले. परंतु, मारहाणीसारखा प्रकार केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.’’रमेश धुमाळ, सहायक पोलीस आयुक्त, कळवा विभाग
कळवा बार व्यवस्थापकासह तिघांना मारहाण : पोलीस हवालदार संख्ये निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 8:59 PM