ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या पोलीस आयुक्तालयात विविध ठिकाणी नाकाबंदी सुरु आहे. त्यानुसार शिळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिळफाटा येथे नाका बंदी सुरु असतांना रिक्षातून गुन्हे करण्याच्या उद्देशाने अवैध्य हत्यारांचा साठा घेऊन जात असणाºया दोघांना ठाणेपोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून लोखंडी कोयता, तलवार, आदींसह इतर हत्यारे मिळून आले आहेत. तसेच ज्या रिक्षाने ते हे हत्यार नेत होते, ती देखील चोरीची असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
या प्रकरणी गौरव उर्फ बाल्या शिवराम वाघे (१९) रा. माणिकपाडा मुंब्रा, अरबाज शौकत अली पठाण (२०) रा. बाबाजी पाटील चाळ, मुंब्रा पनवेल रोड यांना अटक करण्यात आले आहे. ३० मार्च रोजी पहाटे १ ते २ वाजताच्या सुमारास पोलीस उपनिरिक्षक संकेत शिंदे हे तपास पथकातील अंमलदार हे शिळफाटा येथे नाकाबंदीच्या कर्तव्यावर असतांना रात्री १.४५ वाजताच्या सुमारास मुंब्रा पनवेल रोडने मुंब्रा दिशेने भरधाव वेगात येत असलेली रिक्षा त्यांना दिसली. त्यात दोघे जण बसले होते, त्यांच्यावर संशय आल्याने रिक्षा थांबविण्यात आली. परंतु त्या दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांना पाठलाग करुन पकडण्यात आले. त्यांच्याकडे विचारपुस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर त्यांची झडती घेतली असता, लोखंडी कोयता व मोबाईल फोन, दोन लोखंडी तलवारी असा अवैध्य हत्यारांचा साठा आढळून आला. तर रिक्षाच्या कागदपत्रांची चौकशी केली असता ती रिक्षा देखील त्यांनी चोरुन आणल्याचे तपासात पुढे आले. या दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे अधिक तपास केला असता, गौरव उर्फ बाल्या याच्या घरझडतीमध्ये ७ वेगवेगळ्या वर्णनाच्या तलावार, सुरा, कोयता मिळून आला आहे. तसेच त्यांनी ३ रिक्षा चोरी केल्याचे मान्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास शीळ डायघर पोलीस करीत आहेत.