ठाणे : ठरावीक वेळी पोलिसांची पायी गस्त आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केल्याने ठाण्यातील झोन क्रमांक-१ शहरामध्ये येणा-या पोलीस ठाण्यांमध्ये सोनसाखळी चोरांचा उच्छाद पूर्णत: थांबला आहे. संवेदनशील पोलीस ठाण्यांचा समावेश असलेल्या या झोनमध्ये संपूर्ण महिनाभरात सोनसाखळी चोरीची नाममात्र एक घटना घडली आहे.ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या झोन क्रमांक-१ मध्ये राबोडी, ठाणेनगर, नौपाडा, कळवा, मुंब्रा आणि शीळ डायघर या सहा पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. रेल्वेस्थानक आणि बाजारपेठेमुळे ठाणेनगर, कळवा आणि नौपाड्यासारख्या पोलीस ठाण्यांसह मुंब्य्रासारख्या संवेदनशील भागांचाही या झोनमध्ये अंतर्भाव आहे. मोटारसायकलस्वारांनी महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना ठाण्यात जवळपास रोजच घडताहेत.वाढत्या घटनांची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी हे गुन्हे रोखण्यासाठी ठोस व्यूहरचना आखण्याचे आदेश दिले. त्यानुसार, झोन क्रमांक-१ च्या अधिकाºयांनी सोनसाखळी चोरीच्या घटनांचा अभ्यास केला. त्यानुसार, या घटना मुख्यत्वे सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळी ७ ते १० या काळात घडतात.त्यातही सकाळी ८ ते ९ आणि रात्री ९ ते १० या दोन तासांमध्ये जास्त घटना घडतात. मोठ्या रस्त्यांना लागून असलेले सर्व्हिस रोड, सर्व्हिस रोडला लागून असलेले रहिवासी भाग किंवा मुख्य रस्त्यांपासून जवळ असलेले बगिचे तसेच मंदिर परिसरात अशा घटना मोठ्या प्रमाणात घडतात. सोनसाखळी चोरली की, लगेच सर्व्हिस रोड किंवा मुख्य रस्त्यावर पोहोचता आले पाहिजे, हा मोटारसायकलस्वारांचा उद्देश असतो.पोलिसांनी सोनसाखळी चोरांच्या सोयीची वेळ कोणती, हे हेरले असून नेमक्या त्याच वेळेमध्ये गस्त वाढवण्याचे आदेश झोन क्रमांक-१ मधील सर्व पोलीस ठाण्यांना पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी दिले. त्यानुसार राबोडी, ठाणेनगर, नौपाडा, कळवा, मुंब्रा आणि शीळ-डायघर पोलीस ठाण्यांमधील अधिकारी-कर्मचारी सकाळी आणि संध्याकाळी पायी तसेच वेगवेगळ्या वाहनांनी गस्त घालतात. मुख्य रस्ते आणि सर्व्हिस रोडला लागून असलेल्या भागांमध्ये मुख्यत: गस्त घातली जाते. सकाळी आणि सायंकाळी फेरफटका मारणाºया नागरिकांशी संवाद साधून त्यांना सोनसाखळी चोरीच्या घटनांची माहिती दिली जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे.पोलिसांच्या या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम पाहावयास मिळाले आहे. ठाण्यात सोनसाखळी चोरीच्या घटना जवळपास रोजच घडतात.काही घटनांमध्ये दुचाकीस्वारांनी सोनसाखळीसाठी अतिशय क्रूरतेने वृद्ध महिलांना फरफटत नेल्याचेही उघडकीस आले आहे. पोलिसांनी गस्त वाढवल्यामुळे झोन क्रमांक-१ मध्ये गत दीड महिन्यात सोनसाखळी चोरीच्या केवळ ३ घटना घडल्या.सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेले प्रयत्न आणि गस्तीसाठी पोलिसांनी निवडलेली वेळ योग्य असल्याचे यावरून दिसते.>नंबरप्लेट खरीसोनसाखळी चोरीसाठी चोरटे वापरत असलेल्या दुचाकींच्या नंबरप्लेट बºयाचदा खºया असतात.नियमित कारवाईचा भाग म्हणून एखाद्या सिग्नलवर वाहतूक पोलिसांनी अडवले आणि नंबरप्लेट खोटी असल्याचे निदर्शनास आले, तर चोरीची दुचाकी म्हणून मोठी कारवाई होऊ शकते.हा धोका टाळण्यासाठी चोरटे मोटारसायकलची नंबरप्लेट खरीच ठेवतात.काही घटनांमध्ये चोरांनी नंबरप्लेटवर चिखल अथवा शेण लावून एखादा नंबर दडवण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे.>संवेदनशील भागावर नजरसोनसाखळी चोर मुख्यत्वे आंबिवली, भिवंडी आणि मुंब्रामार्गे ठाण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या रस्त्यांना लागून असलेल्या भागांमध्ये सोनसाखळी चोरल्यानंतर चोरटे त्याच मार्गाने सुसाट पळतात. त्यामुळे या रस्त्यांना लागून असलेल्या ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये गस्तीचे प्रमाण पोलिसांनी वाढवले.>सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यात आले. पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी तसे स्पष्ट आदेश दिले होते. त्यामुळे पोलिसांची पायी आणि दुचाकींवर गस्त वाढवण्यात आली. काही मोक्याची ठिकाणे हेरून तिथे फिक्स पॉइंट लावण्यात आले. मंदिर, बगिचे आदी ठिकाणी येणाºया नागरिकांशी संवाद साधून जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रयत्नांचा परिपाक म्हणून सोनसाखळी चोरीचे प्रमाण कमी झाले.- डॉ. डी.एस. स्वामी,पोलीस उपायुक्त,झोन क्रमांक १, ठाणे
सोनसाखळी चोरांना पोलिसांचा ‘ब्रेक’, नागरिक जागरूक, दीड महिन्यात केवळ तीन घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 3:14 AM