ठाणे : एका विशेष मोहिमेंतर्गत ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांच्या ३५० सायलेन्सरवर तसेच १२५ प्रेशन हॉर्नवर थेट ‘बुलडोझर’ने शुक्रवारी दुपारी कारवाई केली. पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने कॅडबरी उड्डाण पुलाखाली ही कारवाई केली.
कर्णकर्कश आवाजाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच रुग्णांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर ठाणे शहरात गेला महिनाभर अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली. याआधी उल्हासनगर, विठ्ठलवारी आणि कल्याण येथे अशाच प्रकारे झालेल्या कारवाईचे नागरिकांनी जोरदार स्वागत केले.
विठ्ठलवाडी येथे १५९ मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करून ११४ सायलेन्सर हे तत्काळ नष्ट केले. त्यापाठोपाठ गेला महिनाभर ठाणे विभागातील कोपरी, नौपाडा, वागळे इस्टेट, मुंब्रा, ठाणेनगर, कापूरबावडी, कासारवडवली आणि राबोडी या नऊ वाहतूक युनिटने ३५० मॉडिफाईड सायलेन्सर, तर १२५ प्रेशर हॉर्न लावणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली.