मीरा रोड : महापालिकेने बांधून दिलेल्या मीरा रोड रेल्वे स्थानकाजवळील स्थलांतरित शांतीनगर पोलीस चौकीचे उद्घाटन महापौरांसह अन्य पक्षांच्या लोकप्रतिनिधींना डावलून पोलिसांनी केवळ भाजपाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते केल्याने नवा वादंग निर्माण झाला आहे. पालिकेचे अधिकारी शिष्टाचार पाळत नसल्याने वादात असतानाच आता नयानगर पोलीस व उद्घाटनप्रसंगी उपस्थित अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. मीरा रोड रेल्वेस्थानकाजवळ शांतीनगर पोलीस चौकी आहे. पोलीस चौकी ही महापालिकेनेच बांधून दिली आहे. मीरा रोड रेल्वेस्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम तत्कालीन आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या प्रयत्नांनी महापालिकेने हाती घेतले आहे. सुशोभीकरणांतर्गत शांतीनगर पोलीस चौकी ही रस्ता-पदपथामध्ये अडथळा ठरत असल्याने ती रेल्वे स्थानकाजवळच्या स्कायवॉकखाली स्थलांतरित करण्याचे प्रयोजन होते. त्या अनुषंगाने महापालिकेने काही लाख खर्च करून स्कायवॉकखाली पोलीस चौकी बांधली. पालिकेने चौकी बांधून दिल्यानंतर नयानगर पोलिसांना पत्र दिले की,चौकीचे काम पूर्ण झाले असल्याने सध्याची चौकी रिकामी करावी. या अनुषंगाने नयानगर पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांना माहिती दिली. पाटील यांच्याकडून जुनी चौकी नवीन शांतीनगर पोलीस चौकीत स्थलांतरित करून कामकाज सुरू करावे, असे कळवले. पोलिसांनी नव्या चौकीत साहित्य स्थलांतरित करून कामकाज सुरू करणे अपेक्षित होते किंवा उद्घाटन करायचेच असल्यास रीतसर शिष्टाचाराप्रमाणे सर्व संबंधित खासदार, महापौर, आमदार, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते, प्रभाग समिती सभापती, स्थानिक नगरसेवक व अन्य लोकप्रतिनिधी तसेच पालिका आयुक्तांना निमंत्रण देणे गरजेचे होते. मंगळवारी पोलिसांनी भाजपाचे आमदार नरेंद्र मेहतांसह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. सेना नगरसेवक प्रशांत दळवीही हजर होते. मेहतांच्या हस्ते चौकीचे उद्घाटन करताना सोबत अपर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम, वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे होते. नगरसेविका दीप्ती भट यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
पोलीस चौकीचे उदघाटन हायजॅक
By admin | Published: April 26, 2017 11:59 PM