सदानंद नाईक
उल्हासनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पुढे सरसावले. विनाकारण फिरणारे नागरिक, वाहनचालकांची झाडाझडती पोलीस घेत असून प्रसिद्ध जपानी, गजानन कपडा मार्केट परिसरातील नेहरू व शिरू चौक सिलबंद केला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी, अतिरिक आयुक्त करुणा जुईकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला. तर दुसरे उपायुक्त मदन सोंडे यांच्या मुलाला संसर्ग झाल्याने, ते नाईलाजाने होम क्वारंटाईन झाले. महापालिका आयुक्तांचा प्रभारी पदभार भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याकडे दिला असलेतरी, सर्व महापालिका कामकाजाचा भार उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्यावर पडला. या पाश्वभूमीवर पोलीस आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडीत आहेत. उल्हासनगर, विठ्ठलवाडी व शहाड रेल्वे स्टेशन बाहेर नागरिकांची वर्दळ नेहमी पेक्षा कमी असल्याने, रिक्षाची संख्या घटली. तीच परिस्थिती शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा मध्ये आहे. भाजीपाला, किराणा दुकान व भाजीपाला मंडई आदी ठिकाणी नागरिकांची वर्दळ असलीतरी, नागरिक सोशल डिस्टन्स ठेवून होते. मात्र, काही नागरिक विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांना पोलिसांनी पोलिस स्टाईल मध्ये समजावून घरी पाठविले जात होते.
शहरातील प्रसिद्ध जीन्स मार्केट, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल मार्केट, फर्निचर मार्केट, बॅग मार्केट, गाऊन मार्केट, जपानी व गजानन कपडा मार्केट, सोन्यासाठी प्रसिद्ध असलेली सोनार गल्ली मार्केटमध्ये शुकशुकाट होता. मार्केटकडे जाणारे रस्ते पोलिसांनी सील करून वाहतूकिस मनाई केली. गोल मैदान परिसर, शिवाजी चौक, उल्हासनगर, विठ्ठलवाडी व शहाड रेल्वे स्टेशन परिसर, खेमानीसह अन्य उघोग विभागात काही प्रमाणात नागरिकांची ये-जा होती. मात्र शहरातील इतर ठिकाणी नागरिकांनी आपापल्या घरात राहणे पसंत केले. संचारबंदी काळात पोलीस आज विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना मारण्या ऐवजी समजाविण्याच्या सुरात असल्याचे चित्र होते. एकूणच नागरिकामध्येही कोरोनाबाबत जनजागृती आल्याचे बोलले जात आहे.