ठाणे : मध्यंतरीच्या काळात सोनसाखळी चोरट्यांपासून काही प्रमाणात का होईना सुटका झाल्याने ठाणेकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. आता मात्र, पुन्हा शहरात त्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. या वाढत्या घटना लक्षात घेऊन एप्रिल महिन्याच्या पोलीस क्राइम मीटिंगमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तसेच सोनसाखळी चोरट्यांची नव्याने ‘टॉप-२०’ यादी तयार करून या घटनांना वेळीच आळा घालण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.ठाणे शहर पोलीस आयुक्तपदाची सूत्रे परमवीर सिंग यांनी हाती घेतल्यावर सर्वप्रथम ठाणेकरांना डोकेदुखी ठरलेल्या सोनसाखळी चोरट्यांवर लक्ष केंद्रित करून अशा चोरट्यांची टॉप-२० यादी तयार केली. त्याच्या माहितीची देवाणघेवाण मुंबई पोलीस दलासह राज्यातील इतर पोलीस दलांमध्ये देणे सुरू केले. तसेच सोनसाखळी चोरट्यांवर मोक्कांतर्गत कारवाई केली. त्याचबरोबर काहींना सुधारण्याची संधी दिल्याने ठाणे शहरासह इतर सर्वत्र सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा बसला होता. मात्र, २०१७ या वर्षात अचानक सोनसाखळी चोरट्यांनी डोके वर काढणे सुरू केले. शहरात दररोज दोन ते तीन घटना घडू लागल्याने सोनसाखळी चोरट्यांवरील पोलिसांचा वचक कमी झाला की काय, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली.त्यातच, एकीकडे ठाणे शहर पोलिसांकडून स्थानिक पातळीवरील नाहीतर देशपातळीवरील गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढू लागले. पण, दुसरीकडे सोनसाखळी चोरीचे गुन्हे कमी झाल्याचा दावा करणाऱ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी पुन्हा उच्छाद मांडला आहे. या गोष्टीकडे पोलीस आयुक्तांनी लक्ष केंद्रित करून पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून खरडपट्टी काढली. (प्रतिनिधी)- गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या खरडपट्टीनंतर तरी ठाणे शहरातील या चोरीच्या घटना कमी होतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
पोलीस आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी
By admin | Published: April 15, 2017 3:19 AM