लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचा आदेश न पाळता विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर अनेक ठिकाणी पोलिसांकडून सौम्य लाठीमार केला जात आहे. मात्र, काही ठिकाणी पोसिलांनीही सामाजिक बांधिलकी जपत अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. ठाणेनगर, कोपरी पोलिसांपाठोपाठ डायघर आणि चितळसर पोलिसांनीही अनेक ठिकाणी रस्त्यावरील मजूरांना रविवारी अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केल्याची माहिती सूत्रांनी दिली.संपूर्ण लॉकडाऊनमुळे हाताला कामच उरले नाही. त्यामुळे घरात दोन पैसे कुठून आणायचे? स्वत:सह कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? या विवंचनेत असलेल्या काही मजूरांना डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी मदतीचा हात पुढे करीत आत्मियता दाखविली. जाधव यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही यामध्ये सक्रीय सहभाग घेतला. काही मजूरांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाल्याचे समजल्यानंतर या कुटूंबियांच्या घरी जाऊन त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे २९ मार्च रोजी डायघर पोलिसांनी वाटप केले.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कष्टकरी, असंघटीत कामगार, स्थलांतरीत, बाहेर गावाहून आलेले विद्यार्थी आणि रस्त्यावरील बेघर आदींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाºयांनी एकत्र येत ही मदत करुन एक आदर्श निर्माण केला. या वस्तू मिळाल्यानंतर तरी घरीच रहा, कोरोनाचा लढा यशस्वी करा, अशा स्पष्ट सूचनाही पोलिसांनी यावेळी मजूरांना केल्या आहेत.* जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठयाबाबत मदतीची गरज काही बिगारी कामगारांनी पोलिसांकडे व्यक्त केली होती. वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर डायघर भागातील पिंपरी ठाकूरपाडा येथील ६० मजूरांच्या कुटूंबीयांना २९ मार्च रोजी तांदूळ, तूरडाळ, हरभरा डाळ, तेल, साखर, बिस्कीट, फरसाण आणि वेफर अशा वस्तूंच्या प्रत्येकी एका पॅकेटसचे काही दानशूर व्यक्तींच्या मदतीने वाटप डायघर पोलिसांनी केले.* संचारबंदीमुळे कर्मनगरी, पिंपरी येथील रुबी जयस्वाल (३०) या महिलेचा पती साकीनाका येथून घरी येऊ शकला नाही. घरात जेवणासाठी काहीच शिल्लक नसल्यामुळे तिच्यासह तिची पाच आणि सात वर्षांची दोन मुलेही उपाशीच होती. तिलाही त्यांनी २३ मार्च रोजी मदत केली. त्यानंतरही तिने पुन्हा मदतीची याचना केल्यानंतर तिला २९ मार्च रोजीही मदत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.* न्हावाशेवा येथील ठाकूर कंटेनरमध्ये चार वाहन चालक हे २४ मार्च रोजी कळंबोलीमार्गे पायी जात होते. दुपारच्या गस्तीच्या दरम्यान जाधव यांच्या पथकाला हे चौघेही चालक दहिसर येथे एका झाडाखाली बसल्याचे आढळले. चौकशीमध्ये त्यांनी भिवंडी येथे जायचे असल्याचे सांगितल्यानंतर भिवंडीकडे जाणाºया एका टँकरमध्ये बसवून डायघर पोलिसांनी त्यांच्या जाण्याची व्यवस्था केली.* दरम्यान, गांधीनगर जंक्शन याठिकाणी एका सामाजिक सस्थेच्या मदतीने चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी गांधीनगर, सुभाषनगर परिसरातील गरजू नागरिकांना प्रत्येकी पाच किलो तांदूळ आणि एक किलो तूरडाळीचे सोमवारी वाटप केले. परिसरातील सुमारे पाच हजार नागरिकांना २० टन तांदूळ आणि सात टन तूरडाळ वाटप केली जाणार असल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली. नागरिकांनी मास्क लावण्याचे, सॅनिटायझरचा वापर करण्याचे तसेच सोशल डिस्टसिंगचे नियम पाळण्याचेही आवाहन यावेळी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी केले.
ठाण्यात पोलिसांनीही जपली सामाजिक बांधिलकी: रस्त्यावरील मजूरांना केले अत्यावश्यक वस्तूंचे वाटप
By जितेंद्र कालेकर | Published: March 30, 2020 6:16 PM
संचादबंदीमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचा ‘प्रसाद’ काही ठिकाणी मिळत आहे. मात्र, काही ठिकाणी पोसिलांनीही सामाजिक बांधिलकी जपत अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केल्याचे चित्र ठण्यात विविध ठिकाणी पहायला मिळत आहे.
ठळक मुद्देडायघर आणि चितळसर पोलिसांचा कौतुकास्पद उपक्रमअडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी पुढे केला मदतीचा हात