ठाणे : शस्त्रसाठाप्रकरणी ठाणे खंडणीविरोधी पथकाने नईम फईम खान याला शुक्रवारी अटक केली होती. त्याला शनिवारी न्यायालयाने १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने आपल्याला २०१४ मध्ये एका व्यक्तीने एके-५६ रायफल दिल्याचे सांगितले. मात्र, ती व्यक्ती कोण, हे त्याने सांगितले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.एके-५६ सह घातक शस्त्रसाठा ठाणे पोलिसांनी ६ जुलै रोजी नईम खान याच्या गोरेगावतल्या घरातून हस्तगत केला. त्याची पत्नी यास्मिन खानला पोलिसांनी अटक केली असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे. तर, २०१६ साली मुंबई येथील इक्बाल अत्तरवाला याच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणी मकोका दाखल करून त्याला अटक केली होती. तेव्हापासून तो ठाण्याच्या कारागृहात बंदिस्त आहे.शस्त्रसाठा घरात मिळाल्याने ठाणे पोलिसांना त्याची चौकशी करायची आहे. मुंबईच्या मकोका न्यायालयातील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शुक्रवारी ठाणे पोलिसांनी कारागृहाकडून नईमचा ताबा घेत त्याला अटक केली. याप्रकरणी अटकेत असलेल्या अन्य आरोपींना यापूर्वीच न्यायालयाने १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
नईमला १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 6:02 AM