डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कारवाईविरोधात फेरिवाला संघटनांनी एकत्र येत ३ नोव्हेंबरपासून जेलभरो आंदोलन ,मोर्चे काढण्याचा निर्धार केला होता. पण त्या मोर्चाला विष्णूनगर, रामनगर पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी परवानगी नाकारल्याने मोर्चा निघणार नसल्याची माहिती संघटनेचे नेते बबन कांबळे यांनी ‘लोकमत’ला दिली. उच्च न्यायालयाने स्थानक परिसरात फेरिवाले बसण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे जेलभरो आंदोलनाचा निर्णय मोर्चेक-यांनी गुरुवारी सकाळीच गुंडाळला होता.
त्यानंतर दिवसभरात विविध पदाधिका-यांच्या बैठकांमध्ये पोलिसांनी परवानगीही नाकारल्याने मोर्चा काढायचा तरी कसा असा पेच संघटनांसमोर होता. त्यामुळे मोर्चा न काढता केवळ पश्चिमेला रेतीभवन येथे एकत्र जमावे असा निर्णय झाल्याचे कांबळे म्हणाले. तसेच केडीएमसीचे आयुक्त पी.वेलारसू यांच्याशी चर्चा करण्याची वेळ मिळते का? त्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ३ हजार फेरिवाले मोर्चासाठी तयार होते, तसेच जेलभरोचीही त्यांची तयारी होती. पण उच्चन्यायालयाच्या आदेशांसह पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे फेरिवाला संघटनांची कोंडी झाली होती. अखेरीस एकत्र येऊन आयुक्त भेटीसाठी दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कायदा सुव्यस्थेच्या प्रश्नावरुन फेरिवाल्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे. केडीएमसी आयुक्तांसमवेत त्यांना बैठक हवी असून ८/९ नोव्हेंबर रोजी ती बैठक होण्याची शक्यता असून त्याची माहिती ६ नोव्हेंबर रोजी मिळेल - रवींद्र वाडेकर, एसीपी, डोंबिवली.