ठाणे : एका १२ वर्षीय मुलीला पैशाचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या रोहित लक्ष्मण मोरे (२०) याला वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. त्याला २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.मोरे हा किसननगर येथील शिवसेना शाखेच्या मागील बाजूला वास्तव्याला आहे. पिडीत मुलगी आणि तो एकमेकांच्या ओळखीचे आहेत. रविवारी रात्री ती ११.३० वाजण्याच्या सुमारास शौचासाठी बाहेर पडली होती. त्यावेळी रोहितने तिला गाठले. तिला शंभर रुपये देतो, असे सांगून त्याने तिला जवळच असलेल्या पेप्सी कंपनीसमोरील अडोशाला नेले. तिथेच त्याने तिच्याशी लैंगिक चाळे करून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार तिने पालकांना सांगितल्यानंतर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी सोमवारी (२० जानेवारी ) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास तिच्या पालकांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला पहाटे ३.३५ वाजण्याच्या सुमारास घरातून अटक केली. त्याच्याविरुद्ध बलात्कार, पोक्सो, विनयभंग या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक शुभांगी गवते याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.