डोंबिवली: गौतम कदम या बावटा दाखवण्याचे काम करणा-या गँगमनने चोरी केली नसली तरीही त्याला आॅनड्यूटी असतानासुद्धा कोणतीही आगाऊ सूचना न देता चौकशीसाठी बोलावलेच कसे? तसेच त्याची चौकशी करा पण गुन्हा दाखल करु नका अशी मागणी सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे करण्यात आली होती. त्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने युनियनचे गँगमन निषेध व्यक्त करण्यासाठी रेल्वे रुळांच्या मधोमध उतरले होते. त्यांनी कुठेही रेल रोको केलेला नाही, मात्र तरीही रेल रोकोचा गुन्हा दाखल झाला असेल तर त्याविरोधात उपोषण केले जाणार असल्याचा पवित्रा संघटनेचे सहाय्यक महामंत्री सुनिल बेंडाळेंनी ‘लोकमत’ला सांगितले.
गुरुवारी संध्याकाळी युनियनच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत कल्याण स्थानकातील फलाट ५ नजीकच्या रेल्वे ट्रॅकमध्ये उतरुन रेल रोकोचा प्रयत्न केला, पण कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तो प्रयत्न हाणुन पाडला. तो प्रयत्न करणा-यांवर शुक्रवारी संध्याकाळी गुन्हे दाखल करण्यात आले. जमावबंदीचे उल्लंघन, रेल्वे हद्दीत बेकायदेशीरपणे घुसणे, रेल्वे वाहतूकीला अडथळा, जमावाने एकत्र येणे आदी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती तपासाधिकारी माणिक साठे यांनी दिली. हे कृत्य करणा-या १५-२० जणांवर हे गुन्हे असून त्याची चौकशी सुरु आहे. तसेच कदम याच्यावरही चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचीही चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, बेंडाळे यांनी रेल रोको केलेलाच नाही, तो युनियनचा उद्देशही नाही. केवळ निषेध व्यक्त झाला होता. वस्तूस्थितीला ग्राह्य न धरता जर लोहमार्ग पोलिस काहीही निर्णय घेणार असतील तर तसे होऊ दिले जाणार नाही. कोणीही रेल रोको केला नाही, रेल्वेला, रेल्वे प्रवाशांना त्याचा कुठेही त्रास झालेला नाही. सीसी फुेटजमध्ये बघावे, दोन ट्रॅकच्या मध्ये काहीजण उतरलेले आहेत हे स्पष्ट आहे. त्यामुळे गुन्हे दाखल करणे योग्य नाही. त्या बावटा दाखवणा-या कदम कर्मचा-यावरही गुन्हा दाखल करणे उचित नाही. यासगळयाचा लोहमार्ग पोलिसांनीही वस्तूस्थितीचा अभ्यास करुन निर्णय घ्यावा, अन्यथा गँगमन काम न करण्याच्या मनस्थितीत असल्याचे बेंडाळे म्हणाले. कामगार हितावह निर्णय होणे अत्यावश्यक आहे असेही ते म्हणाले. अन्यथा रेल्वे रुळांमध्ये काम करण्यासाठी कर्मचारी तयार होणार नाहीत. त्यामुळे देखभालीची मोठी समस्या उद्भवू शकेल, आमची मोठी पंचाईत होत असल्याचे बेंडाळे म्हणाले. तपासाधिकारी साठे यांनीही संबंधितांची ओळख पटवून त्यानंतर चौकशीला बोलावले जाणार असल्याचे सांगितले.