मीरा रोड : भाजप प्रदेशने निवडणुकीदरम्यान राज्यात सुरू केलेल्या कॉफी विथ युथ या खासदार मनोज तिवारी यांच्या भार्इंदर येथील कार्यक्रमात आमदार नरेंद्र मेहता आणि माजी महापौर तथा विधानसभेच्या दावेदार गीता जैन यांच्या समर्थकांनी आगे बढोच्या घोषणा दिल्याने वातावरण तापले होते. या कार्यक्रमात जैन एका बाजूला तब्बल दीड तास उभ्या होत्या. एका महिलेचा हा अपमान असल्याची टीका या पार्श्वभूमीवर सोशल मीडियातून होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, या कार्यक्रमावेळी हॉलमधील बहुतांश खुर्च्या रिकाम्या होत्या. मागच्या खुर्च्या तर पोलिसांनीच भरल्याचे चित्र होते.मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता हे प्रमुख दावेदार असतानाच माजी महापौर गीता जैन यांनीदेखील उमेदवारी मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी चालवली आहे. मेहता व जैन यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. जैन यांच्याविरोधात सोशल मीडियावर अपशब्द वापरणे, त्यांचे जाहिरात फलक काढणे, त्यांच्या बांधकाम प्रकल्पात अडथळा आणणे, भाजपच्या कार्यक्रमांपासून दूर ठेवणे, जैन यांच्या वाढदिवशी वा त्यांच्या कार्यक्रमास कोणी जाऊ नये म्हणून पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी यांच्यावर दबाव टाकणे आदी प्रकार चर्चेत राहिले आहेत.आ. मेहता हे नेहमीच विविध कारणांनी वादग्रस्त राहिले असले तरी, त्यांची थेट मुख्यमंत्र्यांशी जवळीक असल्याने त्यांच्यासह समर्थकांनादेखील भाजपची उमेदवारी मिळणार, याची खात्री आहे. त्यामुळेच आचारसंहिता सुरू होण्याआधीच आ. मेहतांनी प्रचाराचा नारळ फोडून प्रचारास सुरुवातदेखील केली होती. जैन यांनीदेखील जाहिरात फलकांच्या माध्यमातून आपणही मैदानात असल्याचे संकेत दिले होते.उमेदवारीवरून मेहता व जैन यांच्यात चांगलीच चुरस रंगली असताना, भार्इंदरच्या मॅक्सस मॉल सभागृहात गुरुवारी रात्री मनोज तिवारी यांच्या कार्यक्रमातदेखील त्याचे पडसाद उमटले. यावेळी मेहता व जैन समर्थकांनी आपापल्या नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याने काहीसे तणावाचे वातावरण झाले होते. तिवारी यांचा कार्यक्रम संपेपर्यंत पूर्णवेळ, म्हणजेच सुमारे दीड तास जैन या व्यासपीठाच्या बाजूला उभ्याच होत्या.आ. मेहता हे व्यासपीठावरून बाजूला उभे असलेल्यांनी मागे जाऊन बसावे, असे सतत आवाहन करत होते. मेहता समर्थकांनीदेखील जैन व त्यांच्यासोबतच्यांना मागे जाण्यास सांगितल्याने जैन संतापल्या. जैन यांना तिवारी यांचे स्वागत करायचे असल्याचे पाहून, आ. मेहतांनी स्वत: जैन या तिवारी यांचे स्वागत करतील, असे सांगत जैन यांना व्यासपीठावर येण्याची संधीदेखील दिली.यावेळी आ. मेहतांनी तानाशाही आपण सतत करत राहू, असे सांगतानाच अनेक कामे आपण केल्याचे भाषणात सांगितले. हा उपक्रम भाजपमार्फत राज्यभर राबवला जाणार असून, यातून तरुणांशी संवाद साधणार असल्याचे तिवारी म्हणाले.भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी मात्र गीता जैन यांना बसायला दिले नाही, असा विषयच नसून नगरसेवकांसाठी मागे व्यवस्था होती. त्यामुळे महिला म्हणून त्यांचा अपमान केला, असे बोलण्यात अर्थ नाही.
भाजपच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्यांवर पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 1:24 AM