राहुल गांधीच्या भारत जोडो न्याय यात्रे निमित्त भिवंडीत पोलीस यंत्रणा सज्ज
By नितीन पंडित | Published: March 12, 2024 05:36 PM2024-03-12T17:36:35+5:302024-03-12T17:38:11+5:30
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा येत्या १५ मार्च रोजी भिवंडी तालुक्यात प्रवेश करीत आहे.
नितीन पंडित, भिवंडी: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा येत्या १५ मार्च रोजी भिवंडी तालुक्यात प्रवेश करीत आहे.या यात्रेच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्ते तयारीला लागले असतानाच सुरक्षिततेच्या कारणास्तव खबरदारी घेण्यासाठी पोलिस प्रशासनाने सुध्दा कंबर कसली आहे.
पालघर जिल्ह्यातून १५ मार्च रोजी दुपारी २ वाजता भिवंडी तालुक्यात या यात्रेचे आगमन होणार असून तेथून महापोली नदीनाका शेलार मार्गे ही यात्रा भिवंडी शहरात ५ वाजता स्व.आनंद दिघे चौक या ठिकाणी दाखल होईल तेथे चौक सभा होणार असून तेथून राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ग्रामीण भागातील सोनाळे ग्रामपंचायत क्रीडांगणावर मुक्कामी राहणार असून तेथून १६ मार्च रोजी सकाळी ठाणे शहराच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
या यात्रे निमित्त रस्त्यात ठिकठिकाणी व मुक्काम ठिकाणी चोख असा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.ग्रामीण भागात ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली ७० महिला पोलिस , ४३० पुरुष पोलिस ,महीला पोलिस उपनिरीक्षक ६,पोलिस उपनिरीक्षक ३६,पोलिस निरीक्षक ९ यांसह रायगड रत्नागिरी जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस बळ बंदोबस्ता साठी तैनात केला आहे. तर भिवंडी पोलिस उपायुक्त क्षेत्रात सुध्दा मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला जाणार असून त्या बाबतचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीत राहुल गांधी यांचा मुक्काम असल्याने या ठिकाणी विशेष काळजी घेत चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादोसा एडके यांनी दिली आहे.