ठाणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडा न्याय यात्रेच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर शुक्रवार आणि शनिवारी येत आहेत. त्या अनुषंगाने या कालावधीत कोणताही अनुचीत प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी भिवंडीत तब्बल दिड हजाराहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. तसेच ठाण्यातही मुंब्रा, कळवा आणि ठाण्यातील काही भागातही राहुल गांधी यांची ही यात्रा येणार असल्याने त्यासाठी देखील सुमारे ८०० पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शुक्रवारी ठाणे जिल्ह्यात येणार आहे. राहुल गांधी यांनी भिवंडीत प्रवेश केल्यानंतर ते भिवंडी येथील नदीनाका भागात नागरिकांची भेट घेण्याची शक्यता आहे. आनंद दिघे चौक परिसरात सांयकाळी ५ वाजता एक चौक सभा घेणार आहेत. त्यानंतर रांजनोली मार्गे प्रवास करतील. भिवंडीतील काही भाग ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात तर काही भाग ग्रामीण क्षेत्राच्या अंतर्गत येतो. त्यामुळे ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात असणार आहे. ठाणे शहर पोलिसांचे दोन उपायुक्त, पाच साहाय्यक पोलीस आयुक्त, ४० अधिकारी आणि सुमारे एक हजार पोलीस अधिकारी कर्मचारी ठिकठिकाणी तैनात असणार आहे. तर ठाणे ग्रामीण पोलिसांचे पोलीस अधीक्षकांसह ४५० ते ५०० पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
भिवंडीतील सोनाळे गाव परिसरातील एका मैदानात ही यात्रा थांबणार आहे. त्यामुळे त्याठिकाणी देखील चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. दुसºया दिवशी सकाळी ही यात्रा खारेगाव टोलनाका मार्गे मुंब्रा, कळवा, ठाणे शहरात प्रवेश करेल. या दरम्यान, ठाण्यातील इंडिया आघाडीचे नेते या यात्रेत सहभागी होणार आहे. दुसरीकडे ठाण्यातही शनिवारी राहुल गांधी यांची ही न्याय यात्रा येत असल्याने त्या अनुषगांने कायदा सुव्यवस्था आबादीत ठेवण्याच्या दृष्टीने मुंब्रा, कळवा आणि ठाणे शहरातील नियोजन देखील केले जाणार आहे. त्यानुसार याठिकाणी देखील ७०० ते ८०० पोलीसांचा ताफा सज्ज ठेवला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.