भिवंडी: भिवंडी शहरात बँकेची रक्कम दुसऱ्या बँकेत भरणा करण्यासाठी जाणाऱ्या दोघा जणांच्या ताब्यातील ११ लाख रुपयांची रोख रक्कम भर रस्त्यात लुटून पळून गेलेल्या त्रिकुटास शिताफीने उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून आठ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात भिवंडी शहर पोलिसांना यश मिळाले असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत साहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांनी दिली आहे. २९ ऑक्टोबर रोजी पोलीस उपायुक्त कार्यालयासमोरील कोणार्क आर्केड या इमारतीमधील बेसीन कैथोलिक कोऑप बँक लिचे रोखपाल रिजॉय जोसेफ फरेरा बँकेच्या सुरक्षा रक्षकास सोबत घेऊन ११ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम दुचाकीवरून घेऊन जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी बँक कर्मचाऱ्यांच्या दुचाकीस ठोकर मारून दुचाकी वरील झोमॅटो टी-शर्ट परिधान केलेल्या इसमाने लिपिकाच्या हातातील रक्कमेची बॅग खेचून जबरी चोरी करून कल्याणच्या दिशेने पळून गेले होते.
भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त पूर्व विभाग, किशोर खैरनार, सहा. पोलीस आयुक्त पश्चिम विभाग, सुनिल वडके यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे, पोनि गुन्हे गंगाराम वळवी, तपास पथकातील सपोनि शरद पवार, पोउनि रविंद्र पाटील तसेच तपास पथकाचे अंमलदार पोहवा खाडे, कोळी, कोटे, पवार, मंगेश जाधव व भोसले यांनी भिवंडी व कल्याण परीसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच घटना स्थळ व अन्य ठिकाणचे डम्प डाटा घेवून तांत्रिक तपास करून आरोपींचे नावे व मोबाईल नंबर निष्पण केले व आरोपींनी गुन्हा केल्यानंतर ते उत्तरप्रदेश येथे पळून गेल्याचे निष्पन्न झाल्याने सपोनि पवार यांच्या नेतृत्वा खाली पोलीस पथक लखनऊ, उत्तरप्रदेश येथे रवाना होत तेथील एस.टी.एफ. पथकाच्या मदतीने आरोपी अरशद मोहम्मद इलियास मोह, मन्सुरी, वय २२, रा.अजमेर नगर, नारपोली व अब्दुल सईद अब्दुल वफा चौधरी, वय २४, रा. समदनगर, कणेरी यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व तेथेच त्यांच्याकडून गुन्ह्यातील तीन लाख रूपये रोख रक्कम व त्यांनी गुन्हा करतांना एकमेकांशी संभाषण केलेले तीन मोबाईल हस्तगत केले.
आरोपींना अटक करून भिवंडीत आणले असता या गुन्ह्यातील तिसरा आरोपी सैफअली मोह. मुस्तफा खान, वय २५ वर्षे,रा.समदनगर, कणेरी यास अटक करून त्याच्या जवळून तीन लाख व अब्दुल सईद अब्दुल वफा चौधरी याचेकडून दोन लाख असे एकूण आठ लाख रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेले मोबाईल व दुचाकी असा एकूण ९ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.