- जितेंद्र कालेकर ठाणे : शिवाईनगरमधील वृद्धेची सोनसाखळी खेचून पलायन केल्याप्रकरणी अखेर वर्तकनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये असूनही गुन्हा दाखल न करता तक्रार अर्ज घेऊन पोलिसांनी त्यांची आधी बोळवण केली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पोलिसांनी वृद्धेच्या घरी जाऊन तिची तक्रार नोंदवून घेतली.सुमित्रा भीमराव राणे यांचे दीड तोळ्याच्या सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरट्याने पलायन केल्याची घटना १२ सप्टेंबरला रात्री घडली होती. दुसºया दिवशी त्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात दीपक या मुलासह त्यांनी गेल्या. पण पोलिसांनी चार दिवस वाट पाहू, मग याबाबतचा गुन्हा दाखल करू, असा सल्ला त्यांना दिल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्याने शुक्रवारी सकाळीच वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम ढवळे पथकासह राणे यांच्या घरी गेल्या आणि तेथेच त्यांचा घरीच जबाब घेतला. दुपारी कलम ३९२ नुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांच्या सौजन्यामुळे राणे कुटुंबीयांनी ‘लोकमत’चे आणि फिर्याद घेण्यासाठी घरी पोहोचलेल्या पोलिसांचे आभार मानले.
तक्रारीसाठी पोलिसांची घरपोच सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 6:02 AM