मीरारोड - शासन आणि मीरा भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून शहरात सिमेंट रस्ते बांधकामे , सूर्या पाणी पुरवठा योजनेची कामे आदींसाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवण्यात आले असून त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी व रहदारीला अडथळा तसेच पावसाळ्या आधी कामे पूर्ण करणे या बाबत वाहतूक पोलिसांनी बैठक बोलावून ठेकेदारांना अनेक सूचना केल्या आहेत .
राज्य शासनाच्या तसेच महापालिकेच्या मंजूर निधी मधून शहरातील अनेक लहान मोठे रस्त्यांचे काँक्रीटीकरण हाती घेण्यात आले आहे . त्याच बरोबर सूर्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत शहरातील नवीन मोठ्या जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे . त्यासाठी सुद्धा रस्ते ठिकठिकाणी खोदले आहेत .
रस्ते मोठ्या प्रमाणात खोदून कामे करताना त्याठिकाणी महापालिका व ठेकेदार यांच्या कडून मात्र रहदारी आणि वाहतुकीला अडथळा होऊ नये तसेच आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना प्रभावीपणे केल्या गेलेल्या नाहीत . खोदकाम सुरु आहेत तिकडे रहदारी व वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वॉर्डन नेमलेले नाहीत . खोदकाम ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने अनेक अपघात होत आहेत . शिवाय तोंडावर पावसाळा आला असून खोदकाम आदी त्या आधी पूर्ण करणे आवश्यक आहे .
शहरातील रस्ते खोदकाम मुळे होत असलेल्या वाहतूक कोंडी आणि पावसाळा पाहता मीरा भाईंदर - वसई विरार उपायुक्त मुख्यालय सुहास बावचे यांनी आढावा बैठक बोलावली होती . या बैठकीला वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त विलास सानप , पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे सह रस्ते बांधकाम करणारे ठेकेदार व प्रतिनिधी आदी उपस्थित होते .
रस्ते खोदकामची कामे ही पावसाळ्या आधी वेळेत पूर्ण करा . उर्वरितकाम हे पावसाळा संपल्यानंतरच सुरु करा . ज्या ठिकाणी कामे चालू आहेत त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी व नागरिकांना रहदारीला अडथळा येऊ नये म्हणून ट्राफिक वार्डन ठेवा. कामाच्या ठिकाणी बॅरीकेटीग करा . रेडियम पटटी, नाईट ब्लिंकर्स, वाहतूक कोन यांचा वापर करा जेणे करून रात्रीच्या वेळी दुर्घटना होणार नाही आदी सूचना उपायुक्त सुहास बावचे यांनी केल्या आहेत . रहदारी व वाहतुकीला अडथळा होऊ नये तसेच दुर्घटना घडू नये म्हणून आवश्यक उपाययोजना न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे .