ठाणे : सोनसाखळी चोरीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या इराणी टोळ्यांमधील वस्तीतील सुशिक्षित तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांशी पोलिसांनी संपर्क साधून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवाहन केले. त्याला त्यांनी प्रतिसाद दिल्यामुळे गुन्हेगारीकडे वळणारे हात आता व्यापार आणि चांगल्या नोकरीसाठी सरसावणार आहेत. त्यामुळे मंगळसूत्रासारख्या स्त्री धनाचेही रक्षण होईलच, शिवाय इराणींचे मनपरिवर्तन झाल्यामुळे समाजपरिर्तनही होणार आहे.ठाणे जिल्हयातील कल्याणजवळील अंबिवली, मुंब्य्रातील रशिद कम्पाउंड आणि भिवंडीतील शांतीनगर या इराणींच्या मुख्य वसाहती आहेत. मोटारसायकली चोरणे आणि त्याच चोरलेल्या मोटारसायकलींवरुन महिलांच्या गळयातील मंगळसूत्र हिसकावणे हे मुख्य दोन ‘उद्योग’ या टोळया करतात. संपूर्ण महाराष्ट्रातच सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यानंतर परमवीर सिंग यांनी या गुन्हयांचा आढावा घेऊन त्यावर नियंत्रण आणण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी थेट इराणी वस्त्यांवरच कोंम्बिग आॅपरेशन राबवून ४५ जणांना अटक केली. अनेकांना मोक्काअंतर्गतही कारवाई केली. या टोळयांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून सोनसाखळयांचा ऐवजही हस्तगत केला. तरीही काही प्रमाणात हे प्रकार सुरुच होते. त्याचदृष्टीने इराणी वस्त्यांमधील सर्वच रहिवाशांचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना आयुक्तांनी कल्याणचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी इराणी वस्तीत जावून तेथील युवकांचे शिक्षण आर्थिक परिस्थिती सामाजिक वातावरणाचे सर्व्हेक्षण करुन आपला अहवाल पोलिस आयुक्तांना दिला होता. (प्रतिनिधी)
पोलिसांनी केले इराणींचे मनपरिर्तन
By admin | Published: November 10, 2015 11:59 PM