कल्याण- कल्याण रेल्वे स्टेशनवरील अत्यंत धक्कादायक प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे. कल्याण रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर घडलेली एक लाजिरवाणी ही घटना आहे. प्लॅटफॉर्मवर प्रवाशांसाठी बसायला असलेल्या बाकांवर काही प्रवासी बसलेले होते. तेथे त्या प्रवाशांबरोबर एक पोलीस कर्मचारी बसला होता. त्यावेळी तो पोलीस कर्मचारी चक्क त्याच्या बाजूला बसलेल्या एका महिलेच्या पाठीवर हात फिरवताना दिसला. ही संपूर्ण घटना रेल्वे स्टेशनवर असेलल्या काही जणांनी शूट केली आहे.
कल्याणच्या रेल्वे स्थानकातील ४ नंबर फलाटावर एका महिलेची छेड काढताना चे दृश्य या व्हिडीओ तून स्पष्ट दिसून येत आहे. संध्याकाळच्या सुमारास दोन महिला व त्यांच्याबरोबर एक लहान मुलं प्लॅटफॉर्मवरील बाकावर बसलेले या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. दोघीपैकी एक महिला तिच्या लहान मुलाला दूध पाजत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. त्याचवेळी त्या महिलेच्या बाजूला बसलेला एक पोलीस कर्मचारी सगळी लाज सोडून त्या महिलेच्या पाठीवरून हात फिरवतानचं किळसवाणं कृत्य करताना पाहायला मिळतो आहे. त्या सर्व प्रवाशांच्या समोर उभे असलेल्या काही मुलांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून तो प्रकार सर्वाच्या समोर आणून दिला. पोलीसाकडून झालेलं हे कृत्य पाहून संतापलेल्या एका माणसाने पोलिसाला मारहाणही केली. पण तरीही तो पोलीस कर्मचारी निर्लज्जासारखं उलट उत्तर देत होता. पोलीस असल्याचा माज दाखवत माझ्यासोबतच तक्रार दाखल करायला चला, असं उर्मटाप्रमाणे उत्तर देताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळतो आहे. संबंधित पोलीस कर्मचारी दारू प्यायलाच एक महिला व्हिडीओमध्ये बोलतानाच ऐकायला मिळतं आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला जातो आहे. व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करून या पोलीस कर्मचाऱ्याला शिक्षा देण्याची मागणी केली जाते आहे. पण हा पोलीस नेमका कोण आहे ? याबद्दलची माहिती मिळालेली नाही. व्हायरल झालेला व्हिडीओ प्रसारमाध्यमांच्या हाती लागल्यानंतर या आरपीएफ जवानावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सध्या रेल्वे पोलीस या महिलेचा शोध घेत असून मोबाईलमध्ये व्हिडीओ टिपणाऱ्या युवकाचा शोध स्थानकावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेतला जात आहे.