- जितेंद्र कालेकरठाणे : ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक (आरपीआय) नामदेव शिंदे यांच्याविरुद्ध दोन महिला पोलिसांनी विनयभंगाची तक्रार दाखल केली असली तरी हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशाखा समितीने केलेल्या चौकशीत आणखी १० महिलांनी या प्रकरणात जबाब नोंदवताना आरपीआयविरुद्ध तक्रार केल्याने हे प्रकरण गंभीर असल्याचे बोलले जात आहे.दीड वर्षापूर्वीच शिंदे यांची आरपीआय म्हणून ठाणे मुख्यालयात नियुक्ती झाली आहे. तत्पूर्वी, ते मुंबईत कार्यरत होते. त्याआधी अनेक वर्षांपासून ठाण्यातच राखीव पोलीस उपनिरीक्षक (आरएसआय) म्हणून मुख्यालयात नेमणुकीस होते. त्याकाळातही त्यांचे काही प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांशी गैरवर्तन होते, अशी चर्चा आता मुख्यालयाच्या वर्तुळातच दबक्या आवाजात सुरू आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या एका बड्या अधिकाºयानेही शिंदे यांना आपले वर्तन सुधारण्याबाबत काही वर्षांपूर्वीच ‘सक्त ताकीद’ दिली होती. आधीच वादग्रस्त असूनही त्यांची पुन्हा ठाण्यात ‘आरपीआय’ म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या नियुक्तीपासूनच महिला पोलीस कर्मचाºयांशी त्यांचे वर्तन असभ्यपणाचे होते. रजा देताना, ठरावीक ठिकाणी ड्युटी देताना त्यांच्याकडून असभ्यपणे ‘इशारे’ केले जायचे.कार्यालयातच महिला कॉन्स्टेबलला ते चहा करायला लावणे, भांडी घासणे अशी कामेही करायला भाग पाडायचे. त्यांच्यापैकीच दोघींनी धाडस दाखवून याप्रकरणी थेट पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे तक्रार केली. याच तक्रारीची विशाखा समितीने चौकशी केली. यामध्ये १० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले.दोन मुलींसह आणखीही मुलींनी शिंदे यांच्या गैरवर्तनाचा पाढा वाचून चौकशी समितीपुढे दाद मागितली. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन या समितीने शिंदे यांचे निलंबन अथवा बदली तसेच अन्यत्र बदलीच्या शिफारशींसह हा अहवाल पोलीस आयुक्तांकडे सादर केला. समितीच्या चौकशीनंतर दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा असलेल्या पीडित महिलांची कसलीच दखल घेतली गेली नाही.याप्रकरणी दोन महिलांनी विनयभंगाची तक्रार नोंदवली. चौकशी सुरू असल्याने शिंदे यांना अटक केली नसल्याचे ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी सांगितले. शिंदे यांनी आजारी असल्याचे सांगत वैद्यकीय रजा घेतल्याचे मुख्यालयाने सांगितले. त्यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही तो होऊ शकला नाही.
आरोप असलेला पोलीस अधिकारी मोकाटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 6:59 AM