ठाणे : मुंब्रा परिसरातील महापालिकेच्या भूखंडावर असलेल्या बेकायदा बांधकामावर दोन दिवसांपूर्वी कारवाई केल्यानंतर त्याच्या पाहणीसाठी गेलेले कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी यांच्यावर भूमाफियांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा आणि नौपाड्यात फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा स्थायी समितीत निषेध करण्यात आला. अशा घटना भविष्यात घडू नयेत, याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी या बैठकीत सदस्यांनी केली. त्यानुसार, गोसावी यांना यापुढे पोलीस बंदोबस्त दिला जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले. मुंब्रा परिसरात शासनाचा एक भूखंड असून तो नुकताच महापालिकेच्या ताब्यात दिला आहे. त्यावर खूप वर्षांपूर्वी अतिक्रमण झाले असून त्या ठिकाणी पत्र्याची शेड, कम्पाउंड भिंत व पक्के बांधकाम असे अतिक्र मण केले होते. त्यावर, मुंब्रा प्रभाग समितीमधील पथकाने दोन दिवसांपूर्वी कारवाई केली होती. यानंतर, गोसावी त्या ठिकाणी पाहणीसाठी गेले होते. त्या वेळी कारवाईमुळे त्या ठिकाणी जमा झालेले डेब्रिज व पत्रे हटवण्याचे काम पथकाने सुरू केले असता भूमाफियांनी गोसावी यांना मारहाण केली. त्यात ते जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. दुसरीकडे नौपाड्यातदेखील फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या तडवी यांनादेखील फेरीवाल्यांनी मारहाण केली होती. दरम्यान, यापूर्वीदेखील अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले, सहायक आयुक्त घोलप आदींवरदेखील हल्ले झाले होते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना यापुढे घडू नयेत, म्हणून गोसावी यांना पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक बालाजी काकडे यांनी केली. त्यावर, प्रभारी आयुक्त अशोक रणखांब यांनी गोसावी यांना पोलीस बंदोबस्त दिला जाईल, असे आश्वासन दिले.दरम्यान, यापूर्वीही पालिका अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचे हल्ले झाले असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे प्रशासनाने हे पाऊल उचलले.
‘त्या’ अधिकाऱ्याला पोलीस बंदोबस्त
By admin | Published: October 27, 2016 3:46 AM