लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावरून निवृत्त होणाºया ठाण्यातील अफजल पठाण यांनी निवृत्तीनंतरही कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत खात्यात राहून सेवा बजावण्याची व्यक्त केलेली इच्छा गृहखात्याकडून हिरवा कंदील दाखविण्यात न आल्याने अखेर अपूर्ण राहिली. पठाण यांनी पोलीस सेवेतून रविवारी सन्मानाने निवृत्ती पत्करली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे २०२० रोजी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातून मोठ्या संख्येने अधिकारी आणि कर्मचारी वयाची ५८ वर्षे पूर्ण केल्यामुळे निवृत्त झाले. त्यात वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पठाण यांचाही समावेश होता. सध्या सुरू असलेले कोरोना साथीचे संकट, पोलिसांमधील वाढते रुग्ण, त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता या पार्श्वभूमीवर निवृत्तीच्या एक महिन्यापूर्वीच पठाण यांनी आपल्याला काही काळासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी गृहखात्याकडे केली होती.
हरयाणा, राजस्थान आणि तामिळनाडू येथील पोलिसांना वर्षभरासाठी निवृत्तीनंतरही मुदतवाढ मिळाली आहे. महाराष्ट्रातही अशी मुदतवाढ मिळेल, या आशेवर असलेल्या अधिकाºयाला निवृत्तीपर्यंत पोलीस महासंचालक किंवा गृह मंत्रालयाकडून कुठलेच पत्र न आल्याने खिन्न मनाने त्यांनी अखेर रविवारी पोलीस सेवेचा निरोप घेतला.
अफजल पठाण यांची मागणी रास्त असली तरी नियत वयोमानानुसार त्यांची निवृत्ती झाली आहे. त्यांना मुदतवाढ देण्याचा विषय आपल्या आखत्यारीत येत नाही.- विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर