मीरा रोड : पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच ई-सेवा निवृत्ती सुविधा मिळावी, अशी अपेक्षा राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी मीरा रोड येथील पोलीस कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली.
मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयांच्या अंतर्गत कनकिया येथील पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा व परिमंडळ १ पोलीस उपआयुक्त कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी महासंचालक हे गुरुवारी मीरा रोड येथे आले होते. मीरा रोडच्या कनकिया विभागातील नवीन कार्यालयाचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी औपचारिक भेट देत उद्घाटन केले. यावेळी अपर पोलीस महासंचालक संजीव सिंघल, पोलीस आयुक्त सदानंद दाते, अपर पोलीस आयुक्त एस. जयकुमार, पोलीस उपआयुक्त डॉ. महेश पाटील, संजय पाटील आणि अमित काळे, सहायक पोलीस आयुक्त विलास सानप, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ आदी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त मुख्यालयातील ‘ई -कार्यालय’ कार्यप्रणालीचे उद्घाटन महासंचालकांनी केले. कार्यालयाच्या इतर कामकाजाचा आढावा घेत पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्याशी संवाद साधला. उपक्रमाचे कौतुक करून लोकाभिमुख कार्य करण्याचे आवाहन केले. ‘ई-कार्यालय’ प्रणालीचे कौतुक करतानाच पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती दिवशीच ‘ई-सेवानिवृत्ती’ सुविधा मिळावी, अशी अपेक्षा महासंचालक पांडे यांनी व्यक्त केली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
राज्य पोलीस दलात सुमारे एक लाख ९५ हजार पोलीस कर्मचारी, तर ३० हजार अधिकारी आहेत. ३० ते ३५ वर्षे सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास निवृत्ती वेतनासाठी अनेक महिने वाट पाहावी लागते. त्या अनुषंगाने पोलीस महासंचालक यांनी व्यक्त केलेली अपेक्षा भविष्यात सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकते.