डोंबिवली : दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांना आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांकडून विरोधाचा सामना करावा लागला. पोलिसांना त्यांच्याकडून शिवीगाळ व धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला असून, आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस मंगळवारी सायंकाळी ४.४५ वाजता रणधीरसिंग टाक या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका येथील त्रिमूर्ती वसाहतीमध्ये गेले होते. पोलिसांना पाहून रणधीरसिंगच्या कुटुंबातील १० ते १२ जण आणि परिसरातील अन्य नागरिक जमले आणि त्यांनी कारवाईला विरोध करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि पोलिसांना धक्काबुक्की केली. तेथील हल्ल्याच्या पवित्र्यात असलेल्या जमावामुळे पोलीस आरोपीला अटक करू शकले नाहीत. जमावाचा फायदा उचलत आरोपी रणधीरसिंग तेथून पलायन करण्यात यशस्वी ठरला.
दरम्यान, या एकूणच घटनेप्रकरणी रणधीरसिंग याच्यासह त्याच्या कुटुंबातील १० सदस्यांसह आणि इतर १२ जणांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात संबंधित पोलीस पथकाने तक्रार दाखल केली आहे.
--------------