लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : वीजबिल थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणच्या जनमित्राला पोलीस कर्मचाऱ्याने दमदाटी व धक्काबुक्की केल्याची घटना शुक्रवारी अंबरनाथ पश्चिमेतील सर्वोदयनगर येथे घडली. या बाबत आरोपीविरुद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास दाखल करण्यात आला. मुकेश जाधव (रा. ३०१, सत्यम ऑलिंडर, सर्वोदयनगर) असे आरोपीचे नाव आहे.
मोरेश्वर घावट (५९) हे कर्मचारी शुक्रवारी दुपारी सर्वोदयनगर येथील सत्यम ऑलिंडर गृहसंकुलात वीजबिलाची थकबाकी असणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करत होते. वीजबिल थकीत असल्याने त्यांनी जाधव याचा वीजपुरवठा खंडित केला. या रागातून जाधव याने पदाचा धाक दाखवत घावट यांना शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की करत त्यांचे ओळखपत्र हिसकावून घेतले.
घावट यांनी हा प्रकार महावितरणचे सहायक अभियंत्यांना कळवला व त्यांच्यासह फिर्याद देण्यासाठी अंबरनाथ पोलीस ठाणे गाठले. त्यांची फिर्याद घेण्यास टाळाटाळ होत असल्याने कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. तर, अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, कार्यकारी अभियंता राजीव रामटेके यांनीही पोलीस ठाणे गाठले.
पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांनी मांडले ठाण
वर्कर्स फेडरेशनचे सचिव औदुंबर कोकरे यांच्यासह कामगार संघटनांचे प्रतिनिधी व सहकारी वीज कर्मचारी पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांनीही समन्वयकाची भूमिका बजावली. यातून शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास आरोपीविरुद्ध सरकारी कामात अडथळे आणण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्याचे शनिवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जनसंपर्क अधिकारी विजयसिंह दूधभाते यांनी दिली.
------