ठाणे : बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी तथा काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्यासह त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते अशा १० ठिकाणी एकाच वेळी ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने धाडसत्र राबवले. २०१२ ते २०१५ या तीन वर्षांच्या कालावधीत ज्ञात उत्पन्नापेक्षा १३६.२७ टक्के अधिक म्हणजे सुमारे अडीच कोटी जादा मालमत्ता त्यांच्याकडे आढळल्याने ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कासारवडवली पोलीस ठाण्यात त्यांच्यासह नजीब मुल्ला, सुधाकर चव्हाण आदी चार नगरसेवकांविरुद्ध आॅक्टोबर २०१५ मध्ये सुरज परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंवि ३०६ तसेच लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७,१३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलेले आहे. याच गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस आयुक्त परमवीर सिंग, गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या अधिपत्याखाली सहायक पोलीस आयुक्त अविनाश मोहिते, विशेष तपास पथकाचे (एसआयटी) वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्याकडून सुरू आहे. याच पथकाने गेल्या दीड वर्षात केलेल्या चौकशीत विक्रांत चव्हाण आणि त्याची पत्नी अरुणा यांनी एप्रिल २०१२ ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीमध्ये आपल्या उत्पन्नापेक्षा १३६.२७ टक्के अपसंपदा संपादित केल्याचे आढळले. त्यासाठी विक्रांत याची पत्नी अरुणा यांना त्यांचे सासरे रवींद्रन नायर, सासू शांता नायर, कार्यकर्ते उमेश कांबळे, संतोष गावडे, प्रकाश भोसले, भास्कर गडामी, अनंत घाडगे, महेश शिर्के, परेश रोहित आणि कल्पतरू प्रॉपर्टीजचे उपाध्यक्ष संजय डागा यांनी मदत केल्याचेही तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्याविरुद्धही लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली शुक्रवारी (१७ नोव्हेंबर २०१७) सकाळी ७ वाजता गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त महादेव भोर यांच्या नेतृत्वाखाली चव्हाण यांच्या मानपाडा येथील हॅपी व्हॅली येथील पाचव्या मजल्यावरील ५०३ आणि ५०४ या सदनिकांमध्ये, सासरे रवींद्रन नायर यांच्या टिकुजिनीवाडीतील कल्पतरू हिल्स तसेच वर्तकनगर भागातील विनायक सोसायटीतील विक्रांत याच्या बंद घरातही ही झाडाझडती घेण्यात आली. याशिवाय, वर्तकनगर भागातीलच उमेश कांबळे, संतोष गावडे, भास्कर गडामी, प्रकाश भोसले, अनंत घाडगे, महेश शिर्के आणि परेश रोहित या कार्यकर्त्यांच्या घरातही हे धाडसत्र राबवण्यात आले. याव्यतिरिक्त कल्पतरू प्रॉपर्टीजचे उपाध्यक्ष संजय डागा यांच्या मुंबईतील सांताक्रूझ येथील गॅ्रण्ट हयात हॉटेलसमोरील कार्यालयातही ठाणे पोलिसांनी धाडसत्र राबवले.डागा यांनी त्यांच्या बांधकाम व्यवसायातील कागदपत्रे विक्रांत चव्हाण याला फायदा होण्यासाठी दिली. तसेच सदनिकांची विक्री करताना पैशांची फिरवाफिरव केल्याचाही आरोप आहे.....................अशी झाली कारवाईगेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या चौकशीवरून गुरुवारी रात्रीच १० ठिकाणी धाडी टाकण्यासाठी १० अधिकाºयांची पथके तयार करण्यात आली. यामध्ये सहायक पोलीस आयुक्त महादेव भोर, अविनाश मोहिते, निरीक्षक संजय साबळे, प्रदीप भानुशाली, राजेश बागलकोट, प्रदीप उगले, अनघा देशपांडे, ए.डी. सोनवणे आदी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात यापूर्वी कर्तव्य बजावलेल्या १० अधिकाºयांचा विशेष समावेश करण्यात आला. अत्यंत गोपनीयरीत्या अचानक झालेल्या या धाडसत्रामुळे विक्रांत चव्हाण व त्यांचे कार्यकर्ते तसेच पालिका वर्तुळातही एकच धावपळ उडाली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती. आता केवळ मालमत्ता, दागिने आणि रोकड यांच्या नोंदी घेणार असल्यामुळे तूर्तास केवळ पंचनामे केले जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली....................................किती आहे विक्रांत चव्हाण यांची मालमत्ताविक्र ांत चव्हाण यांच्या मालकीचा वर्तकनगरमधील विनायक सोसायटीमध्ये २३ लाखांचा फ्लॅट, शुभंकर सोसायटीमध्ये ४० लाख २५ हजारांचा फ्लॅट, मँचेस्टर बिल्डींगमध्ये २४ लाख २० हजारांचा फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे या गावी विक्र ांत यांनी ५६ लाख रु पयांचा दुमजली बंगला बांधला आहे. मार्गताम्हाणे गावात त्यांच्या वडिलांचे पक्के घर असल्याची नोंद तेथील ग्रामपंचायतीमध्ये आहे. परंतु त्याठिकाणी कोणत्याही परवानगीशिवाय विक्र ांत यांनी ३२०० चौरस फुटाचा दुमजली बंगला बांधला आहे. चव्हाण यांच्याकडे ५३ हजारांचा अॅपल ६ असून १७ लाख २६ हजारांची इनोव्हा कार आहे. पाच लाखांची मुदत ठेव सापडली आहे. आरोपींमध्ये समावेश असलेले अनंत घाडगे, महेश शिर्के, परेश रोहीत, उमेश कांबळे, संतोष गावडे, प्रकाश भोसले, भास्कर गडामी, महेश शिर्के, परेश रोहत या सर्वांनी मिळून ८० लाख ८७ हजारांची उसनवारी रक्कम दिली आहे. त्यांच्यापैकी अनेक जण सेवानिवृत्त असून त्यांचे मासिक उत्पन्न अवघे अडीच हजार रु पये आहे, तर एक जण वडापावच्या दुकानामध्ये नोकरीला असून त्याने पाच लाख रु पये दिल्याची माहिती उघड झाली आहे...............................रवींद्रन नायर यांच्याकडून लाखोंची उलाढालविक्र ांत यांचे सासरे रवींद्रन नायर १९८३ मध्ये सौदी आरेबिया येथून वैद्यकीय कारणास्तव भारतात परतले. सध्या ते कोणत्याही नोकरीवर नसून त्यांची परदेशातील अजित आणि अनिल ही दोन मुले त्यांना केवळ पाच हजार रुपये पाठवितात. बँकेतील पैशातून येणाºया व्याजावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. असे असताना जावई विक्र ांत नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी हॅप्पी व्हॅली येथे २० लाखांचा फ्लॅट घेतला; तर वर्तकनगर येथील रेनआर्ट येथे ५४ लाख ८६ हजारांचा फ्लॅट घेतला. एका खाजगी बिल्डरला ६० लाख रु पये दिले. पत्नी शांता नायर यांच्या नावाने ७१ लाख ६० हजाराचा फ्लॅट खरेदी केला. याशिवाय त्यांच्या खात्यात ५५ लाख, तर पत्नीच्या खात्यात ३६ लाख ५० हजारांचा भरणा केला असून त्याबाबत त्यांना कोणताही तपशील पोलिसांना देता आलेला नाही.
परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्या घर आणि कार्यालयांवर पोलिसांचे छापे ...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 10:53 PM