मिरा रोड - काशिमीरा येथील संत जेरॉम चर्चच्या यात्रेसाठी पुर्वी प्रमाणे बैलगाडी व घोडागाडीने येणारया उत्तन - गोराई आदि भागातील ग्रामस्थांना या पुढे बैल वा घोडा गाड्यांची शर्यत महागात पडणार आहे. न्यायालयाची बंदी असताना डांबरी रस्त्यावर बैलगाड्यांचे शर्यत लाऊन बैलांना बेफाम पळवणारया दोन बैलगाडी चालकांसह अन्य ५ जणांवर काशिमीरा पोलीसांनी गुन्हा दाखल केलाय.डिसेंबर मध्ये नाताळ नंतर काशिमीरा येथील संत जेरॉम चर्चची मोठी यात्रा असते. पुर्वी पासुन भरणारया या यात्रेस त्यावेळी वाहनं नसल्याने उत्तन, डोंगरी, तारोडी, गोराई आदी गावां मधुन भाविक बैलगाडी व घोडागाडीने येत . आता डांबरी रस्ते होऊन वाहनांचा पर्याय असला तरी या भागातील ग्रामस्थ या यात्रेसाठी आधी पासुनच बैल वा घोडा गाड्यांची रंगगरंगोटी करुन सजवतात. सहकुटुंब बैलगाडी वा घोडागाडीने चर्चच्या परिसरात पोहचतात. रात्रभर मुक्काम केल्या नंतर दुसरया दिवशी आपापल्या घरी परततात. पण प्रवासात सर्रास बैलगाड्या व घोडा गाड्यांची शर्यत लावली जाते. किंवा त्या बेफाम पळवल्या जातात. या मुळे रस्त्या वरुन जाणारया अन्य वाहन चालकांची देखील भितीने गाळण उडत असते.यंदाच्या यात्रे दरम्यान देखील दोन बैलगाड्यां मध्ये रस्त्यावर लागलेली शर्यत आणि त्यात एका बैलगाडीचे चाक निखळुन झालेल्या अपघाताचा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.एका प्राणीमित्र संस्थेने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर सोमवारी काशिमीरा पोलीसांनी या प्रकरणी दोन बैलगाड्यांचे चालक तसेच बैलगाडीत बसलेले अन्य ५ असे मिळुन एकुण ७ जणां विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.बैलगाड्यांच्या शर्यतीस उच्च न्यायालयाने बंदी घातली असताना न्यायालय व शासन आदेशाचे उल्लंघन, प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्या बाबत अधिनियम कलम ११ (१) व १ चा अ तसेच भादंविसंच्या कलम १८८, २८९ नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. व्हिडीयोच्या आधारे काशिमीरा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
काशिमीरा यात्रेतील बैलगाड्यांची शर्यत, पोलीसांनी केला गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 8:47 PM