ठाणे : ठाणे लोहमार्ग पोलिसांची तत्परता एका घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओतून उघडकीस आली आहे. ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक ९-१० वर बेशुद्ध पडलेल्या प्रवाशाला चार लोहमार्ग पोलिसांनी स्ट्रेचरची वाट न पाहता उचलून दवाखान्यात नेले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच प्रवाशाने जीव सोडला; परंतु पोलिसांनी त्यांच्या पातळीवर प्रयत्नांची शर्थ केली.
नवी मुंबईतील ऐरोली येथे राहणारे विद्यमान माने (५२) हे या मृत प्रवाशाचे नाव आहे. ते गुरुवारी मुंबईतील केईएम रुग्णालयातून उपचार घेऊन पत्नीसह परतीचा प्रवास करत होते. ते ठाणे रेल्वेस्थानकात ऐरोलीला जाणाऱ्या लोकलची वाट पाहत होते. त्याचवेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि चक्कर येऊन ते कोसळले. त्यावेळी झालेली गर्दी पाहून गस्तीवर असलेले लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विवेक पाटील काय झाले, हे पाहण्यासाठी गेले. त्यांनी तत्काळ ठाणे प्रबंधक कार्यालयात फोन करून स्ट्रेचर पाठवण्याची मागणी केली. पण, ते येईपर्यंत उशीर होईल आणि माने यांची प्रकृती गंभीर झाल्याची बाब लक्षात घेत, पाटील यांनी त्यांच्या सहकाºयांना तातडीने बोलवले. पोलीस शिपाई विशाल खांडगे, योगेश सुपेकर आणि समीर गोठणकर यांच्या मदतीने पाटील यांनी तत्काळ माने यांना उचलून पाच ते सहा मिनिटांत फलाट क्रमांक-२ येथील प्रथमोपचार केंद्रात दाखल केले; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी माने यांना मृत घोषित केल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.
माने यांची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून स्ट्रेचर मागवला. पण, प्रकृती आणखी बिघडल्याने सहकाºयांना बोलवून त्यांना फलाट क्रमांक-२ येथील दवाखान्यात दाखल केले. पण, त्यांना वाचवता आले नाही. अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे.- विवेक पाटील, पोलीस शिपाई, लोहमार्ग ठाणेअशा घटना नेहमीच घडतात. प्रत्येक वेळी स्ट्रेचरची वाट पाहत न बसता लोहमार्ग पोलीस प्रवाशाला खांद्यावर उचलून नेतात. या घटनेतही प्रवाशाला उचलून दवाखान्यात नेले; पण त्यांचे प्राण वाचले नाही, ही खंत आहे.- राजेंद्र शिरतोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहमार्ग ठाणे