ठाणे : रिक्षाने ठाणे रेल्वेस्थानक ते खारकरआळी असा प्रवास करणाऱ्या ईशिता अरविंद जैन (३०) हिच्या कपड्यांची बॅग रविवारी गहाळ झाली होती. ११ मार्चला तिचा विवाह असल्यामुळे लग्नाच्या बस्त्याची ही खरेदी होती. त्यामुळे ती अत्यंत भावुक झाली होती. दरम्यान, ठाणेनगर पोलिसांना बुधवारी ही बॅग शोधण्यात यश आल्याने ईशिताला आनंद झाला.
विलेपार्ले येथे राहणारी ईशिता ही १६ फेब्रुवारीला ठाण्यात आईसह लग्नाच्या बस्त्याच्या खरेदीसाठी आली होती. दुपारी ४ च्या सुमारास या दोघीही ठाणे स्थानक ते खारकरआळी असा रिक्षाने प्रवास करीत होत्या. त्यावेळी त्यांच्याकडील लग्नासाठी खरेदी केलेली सुमारे ३० हजारांच्या कपड्यांची एक बॅग त्या रिक्षामध्येच विसरल्या. याबाबतची तक्रार त्यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात १६ फेब्रुवारीला दाखल केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी दखल घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे हे प्रकरण सोपविले. पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते, पोलीस नाईक विक्रम शिंदे, रवींद्र पांढरे व कॉन्स्टेबल रोहन पोतदार आदींच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्हीद्वारे रिक्षाचालकाचा शोध घेतला. यात जनेंद्र यादव (४८, रा. रामबाग, उपवन) या रिक्षाचालकाचे नाव समोर आले. त्याची चौकशी केल्यानंतर आपल्याला ही बॅग मिळाली. पण प्रवाशाचा काहीच पत्ता माहीत नसल्यामुळे आपण ती तशीच ठेवल्याचे त्याने मान्य केले. ही बॅग ईशिताला बुधवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमवंशी यांनी सुपूर्द केली.