लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पोलिसांनी नोटिसा बजावूनही सोमवारी (दि. ३०) मध्यरात्री १२ वाजता कोरोनाचे नियम पायदळी तुडवत मनसेने दहीहंडी फोडली. पोलीस बंदोबस्त असतानाही भगवती शाळेच्या मैदानात मनसैनिकांनी पोलिसांच्या साक्षीने थर रचले. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करून रात्री दोन वाजता त्यांची जामिनावर सुटका केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहीहंडी साजरी न करण्याचे आदेश दिले असताना हे आदेश धुडकावत पोलिसांसमोर मनसेने थर रचून दहीहंडी फोडली. मनसेने दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असा निर्धार जाहीर केल्यानंतर पोलिसांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या; पण या नोटिसांना न जुमानता भगवती शाळेच्या मैदानात मनसेने रविवारपासून उत्सवाची तयारी केली. रविवारी मनसे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते. नांदगावकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. सोमवारी मनसेने स्टेजबांधणी सुरू केल्याने नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन काम थांबविले. उत्सव होणारच, या भूमिकेवर ठाम असलेल्या मनसेने स्टेजवरच धरणे आंदोलन केले आणि ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी मनसैनिकांची समजूत काढली. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह मनसैनिकांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यामधून बाहेर आल्यानंतर दहीहंडी होणारच असे जाधव यांनी जाहीर केले. त्यानुसार सोमवारी रात्री मनसैनिकांनी थर रचत उत्सव साजरा केला. नंतर कार्यकर्त्यांना अटक करून रात्री त्यांची तत्काळ जामिनावर सुटका केली.
------------------------
हिंमत होती म्हणून आम्ही करून दाखविले. ठाकरे सरकारला आम्ही भीत नाही. आम्ही आजही आमच्या मतावर ठाम आहोत, हिंदू सण, उत्सव हे झालेच पाहिजेत.
- अविनाश जाधव, जिल्हाध्यक्ष, मनसे
...........