ठाणे : महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला आहे. तरीही खबरदारीची उपाययोजना म्हणून ठाणे शहर पोलिसांनी आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील मोक्याच्या तसेच संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील राबोडी भागात परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांनी रुट मार्चचे आयोजन केले होते.
आगामी सण दहीहंडी उत्सव, गोपाळकाला, गणेशोत्सव आणि २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आधी पुकारलेल्या बंद च्या अनुषंगाने शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये तसेच नागरिकांनी निर्भय राहण्याच्या दृष्टीने २२ ऑगस्ट रोजी राबोडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 'रूट मार्चचे आयोजन केले होते. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार झालेला हा रुट मार्च राबोडी पोलिस ठाण्यापासून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुरू झाला. त्यानंतर पुढे - वृंदावन बस स्टॉप- जुनी राबोडी पोलीस ठाणे - नूर मस्जिद - जुम्मा मस्जिद - अक्सा मेडिकल नाका - सुन्नी सर्कल मस्जिद - क्रांतीनगर - सरस्वती पोलीस चौकी - आकाशगंगा सोसायटी - पंचगंगा चौक - गोदावरी सोसायटी आणि रुस्तमजी सोसायटी भागात त्याची सांगता झाली.
या रूट मार्चमध्ये नौपाडा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, पोलीस निरीक्षक किशोर खरात, आठ पोलीस अधिकारी, २७ अंमलदार, राज्य राखीव दलाचे एक प्लाटून आणि आधिकरी, १४ अंमलदार, रॅपिड ॲक्शन फोर्स तीन अधिकारी ३० अंमलदार उपस्थित होते. तसेच पीटर मोबाईल, बीट मार्शल, रॅपिड ॲक्शन फोर्सची तीन वाहने आदींचा यात सहभाग होता.‘शनिवारी होणारा महाराष्ट्र बंद आता मागे घेण्यात आला आहे. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस ठाण्यांच्या पातळीवर राखीव फोर्स तैनात केलेला आहे. खबरदारी म्हणून काही संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त तैनात ठेवला आहे.सुभाष बुरसे, पोलिस उपायुक्त, ठाणे शहर, परिमंडळ १