ठाणे : बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्या घोडबंदर रोड येथील ‘हॅपी व्हॅली’ मधील निवासस्थानी पोलिसांच्या दोन पथकांनी झडती घेतली. या झडतीमध्ये मालमत्ता आणि त्यांच्या बँक व्यवहारांची चौकशी केली. काही कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी अहमदाबाद येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल येऊन आठवडा उलटला असला तरी अद्याप चौघांपैकी कोणीही पोलिसांच्या हाती लागलेले नाही.गेल्या काही दिवसांपासून ‘भूमिगत’ झालेले नगरसेवक विक्रांत, सुधाकर चव्हाण, हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला या प्रत्येकाच्या कार्यालयामध्ये आणि निवास्थानी पोलिसांनी झडती घेतली आहे. त्यापैकी विक्रांत यांच्या घरी कोणीही नसल्यामुळे त्यंच्या घराची झडती पोलिसांना घेता आली नव्हती. वर्तकनगर येथील त्यांच्या कार्यालयात तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप गोरे, वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. जी. गावीत यांच्या पथकाने तपासणी केली होती. सुमारे चार ते पाच तास चाललेल्या या झडतीत पोलिसांच्या हाती फारसे काही लागले नव्हते. दरम्यान, सोमवारी दिवसभर त्यांच्या निवासस्थानी नेमकी काय हाती लागले, काय तपासणी करण्यात आली? याबाबतचा तपशील देण्यास पोलिसांनी नकार दिला. (प्रतिनिधी) पोलिसांची टोलवाटोलवीठाण्याचे सह पोलीस आयुक्त यांच्या थेट नियंत्रणाखाली या प्रकरणाचा तपास सुरु असल्यामुळे कोणीही अधिकारी या विषयातील तपशील देण्यास धजावत नाही. स्वत:आयुक्त परमबीर सिंग हेही सह पोलीस आयुक्तांकडे याची माहिती मिळेल, असे सांगतात. तर लक्ष्मीनारायण यांच्याकडे विचारणा केल्यावर ते जनसंपर्क अधिकारी गजानान काब्दुले यांच्याकडे संपर्क साधण्याचा सल्ला देतात. काब्दुले यांच्याशी संपर्क साधल्यावर तपास अधिकारी सहाय्यक आयुक्त दिलीप गोरे यांच्याकडे माहिती मिळेल, असे सांगतात. गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी यातील तपासासाठी कासारवडवली पोलिसांना मदत करीत असले तरी हे अधिकारीही या प्रकरणावर कानावर बोट ठेवून आहेत.
विक्रांत चव्हाणांच्या घरी पोलिसांची झडती
By admin | Published: November 03, 2015 2:59 AM