मीरारोड - रोजगार बुडाल्याने शहरात रहायचे कसे अशा अडचणीत सापडलेल्या लोकांनी मालवाहु वाहनाने चोरी छूपे आपल्या गावी पलायन सुरु केल्याचा प्रकार भार्इंदर व मीरारोड मध्ये उघडकीस येत आहेत. गेल्या दोन दिवसात पोलीसांनी अशी १० वाहने पकडुन ती जप्त करत गुन्हे दाखल केले आहेत. या वाहनां मधुन सुमारे २५० लोकांसह लहान मुलांने राज्यात तसेच परराज्यात नेले जात होते. सदर १० वाहने पोलीसांनी जपत केली असुन गुन्हे दाखल केले आहेत. तर भार्इंदर येथील एका वाहनास वाहतुकीसाठी अधिकार नसताना चक्क एका भाजपा नगरसेवकाने परवानगी पत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत महामार्गावरील सगणाई देवी मंदिर नाका जवळ शनिवारी रात्री तब्बल ६ ट्रक व टॅम्पो वाहतुक पोलीस व काशिमीरा पोलीसांनी पकडले. या मध्ये उत्तर प्रदेश, सातारा आदी ठिकाणी जाणारी लोकं लपुन प्रवास करत होती. यात महिला व मुलांचा समावेश होता. नवघर पोलीसांनी भार्इंदर पूर्वेला एक ट्रक उत्तर प्रदेश येथे जाण्याच्या तयारीत असताना तो पकडला. त्यात ३० लोकं व लहान मुलं होती.भार्इंदर पश्चिमेला पोलीसांनी एक प्रवासी वाहन पकडले असता त्यात १६ लोकांसह लहान मुलं जालना येथे जाण्यास निघाले होते. सदर लोकं राई- मुर्धा भागातील होती. धक्कादायक बाब म्हणजे येथील भाजपा नगरसेवक विनोद म्हात्रे यांना त्यांना जाण्यासाठी परवानगी देणारे पत्र दिल्याचे पोलीसांना सापडले आहे. सदर बाब पालिका आयुक्तांना कळवण्यात आली आहे. अधिकार नसताना असे पत्र दिल्याने म्हात्रे यांच्यावर कारवाईची शक्यता असुन पोलीस चौकशी करत आहेत.शुक्रवारी रात्री मीरारोड पोलीसांनी बेव्हर्ली पार्क नाका दरम्यान अंडी वाहतुक करणारा एक ट्रक पकडला असता ट्रेच्या मागे १९ महिला व १३ पुरुष असे ३२ जण दाटीवाटीने लपुन बसलेले होते. सदर लोकं कर्नाटकच्या बिदर येथे जाणार होते. तर भार्इंदर पुर्वेच्या पांचाळ उद्योग भागात मालवाहु ट्रक मधुन सुमारे ३५ जणांना उत्तर प्रदेश येथे नेले जात असताना नवघर पोलीसांनी कारवाई केली.पोलीसांनी ट्रक मध्ये सापडलेल्या लोकांना परत त्यांच्या राहत्या ठिकाणी पाठवुन दिले आहे. आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या, इकडे उपाशी मरण्या पेक्षा गावी जाऊन मिळेल ते खाऊन राहु अशा विनवण्या लोकां कडुन केल्या जात होत्या. तर मालवाहु वाहनां मधुन बेकायदेशीरपणे लोकांना राज्यात व परराज्यात सोडण्यासाठी ट्रक - टॅम्पो चालकां कडुन वाट्टेल तसे पैसे घेतले जात असल्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे.
मीरा भाईंदरमध्ये पोलीसांनी २५० लोकांना लपवूनन नेणारे १० ट्रक - टॅम्पो पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 8:54 PM