कल्याण- कल्याण वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचारी वंदना कावळे यांनी प्रामाणिकपणा दाखविला आहे. त्यांना वाहतूक नियंत्रण करीत असताना रस्त्यात पडलेले 47 हजार रुपये मिळून आले. ती रक्कम त्यांनी पोलिस ठाण्यात जमा केली आहे. कावळे यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कावळे या कल्याण गुरूदेव हॉटेलजवळील चौकात आज शनिवारी कर्तव्य बजावित होत्या. त्यांना रस्त्यात पडलेली रक्कम दिसली. दुचाकीवरुन भरधाव जाणऱ्या एकाद्या दुचाकी स्वाराकडून ही रक्कम रस्त्यात पडली असावी. रस्त्यात पडलेल्या नोटा हा हवेने इतरत्र उडू लागल्या. तेव्हा जणू रस्त्यात नोटांचा पाऊस पडला की काय असे चित्र होते.
मात्र चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी कावळे यांच्या लक्ष्यात ही बाब आली. त्यांनी सगळ्या नागरिकांना नोटा जमा करण्याचे आवाहन केले. जमा केलेले नोटांचे पुडके त्यांनी वाहतूक नियंत्रण शाखेच्या कल्याण कार्यालयात जमा केले. कावळे यांच्या या कृतीविषयी वाहतूक नियंत्रण शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतूक केले. सापडलेली रक्कम महात्मा फुले पोलीस ठाण्यात जमा केली आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक संभाजी जाधव यांनी या घटनेची माहिती दिली आहे. वाहतूक पोलिस हा दिवसभर एका चौकात उभा राहून त्याचे कर्तव्य बजावित असतो. तरी देखील वाहतूक कोंडी झाल्यावर तोच नागरीक, प्रवासी आणि वाहन चालकांकडून टीकेचा शिकार होतो.
कल्याणमधील वाहतूक कोंडी व वाहतूक नियंत्रण करताना कावळे यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा हा त्यांच्या कर्तव्यासारखाच महत्वाचा आहे. इतर पोलिसांनीही चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावून असाच प्रामाणिकपणा दाखविल्यास पोलिस खात्याची मान उंचावेल अशी आपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली आहे.