भिवंडी : ज्या जागेवर पोलीस ठाणे नको म्हणून झालेल्या विरोधातून दंगल उसळली आणि दोन पोलिसांना ठेचून मारण्यात आले होते. नंतर जाळण्यात आले होते. त्या जागेवर अखेर पोलीस ठाणे होणार आहे. कोटरगेट मशिदीसमोर ही जागा आहे आणि त्यावर बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. यामुळे पोलीस ठाणे उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी मंगळवारी पोलीस संकुलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. शहरातील कोटरगेट मस्जिदसमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर निजामपूर पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे व सहायक पोलीस आयुक्तांचे कार्यालयाचे काम सुरू झाले होते. त्यास काही नागरिकांनी विरोध केला होता. या वादातून ५ जुलै २००६ मध्ये उसळलेल्या दंगलीत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन नागरिकांचा बळी गेला. तर संतप्त नागरिकांनी केलेल्या हल्यात दोन पालिसांना ठेचून मारण्यात आले. नंतर त्यांना जाळण्यात आले होते. त्यानंतर विविध ठिकाणी कायदेशीर लढाई सुरू होती. त्यात ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे उच्च न्यायालयाने त्यावर बांधकाम करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. तरी देखील पोलिसांनी शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक व धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचे समाधान करण्यात पोलीस यशस्वी झाले. कुणाच्या मनात काही कायदेशीर विरोधाचे मुद्दे असल्यास त्यांना आवाहन करून चर्चेस बोलावत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला त्या ठिकाणी पोलिसांच्या प्रतिष्ठेसाठी नव्हे, तर नागरिकांची शांतता अबाधित राखण्यासाठी पोलीस ठाणे उभारायचे असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस ठाणे व पोलीस निवासस्थानांच्या बांधकामास प्राधान्य दिल्याने शहरातील पोलीस ठाणी व निवासस्थाने सुसज्य व सुस्थितीत दिसतील,असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
भिवंडीत ‘त्या’ जागेवर पोलीस ठाणे
By admin | Published: April 12, 2017 3:37 AM