लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड -कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना नगरसेवक - राजकारणी मात्र मुजोरी करत नियमांचे उल्लंघन करत असल्याने नया नगर पोलिसांनी काँग्रेस गटनेत्यास दणका दिला आहे. सेल्फी पॉईंटच्या उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी विना मास्क गर्दी जमळवल्या प्रकरणी मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी काँग्रेस गटनेते जुबेर इनामदार सह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे . विशेष म्हणजे काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन सह अनेक नगरसेवक , पदाधिकारी व कार्यकर्ते विना मास्क गर्दी करून गोळा झाले होते .
काँग्रेस गटनेते जुबेर इनामदार यांनी त्यांच्या नगरसेवक निधी मधून मीरारोडच्या नया नगर भागात स्टर्लिंग सभागृहच्या बाजूला रेल्वे समांतर रस्त्यालगतच्या नाल्यावर सेल्फी पॉईंटचे बांधकाम केले आहे . त्याच्या उदघाटनच्या कार्यक्रम करण्यासाठी इनामदार यांनी प्रभाग समिती कार्यालयातून परवानगी घेतली होती . परंतु स्थानिक पोलीस ठाण्याची परवानगी घेतली नव्हती . सदर सेल्फी पॉईन्टचे उदघाटन इनामदार यांनी काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांच्या हस्ते केले . यावेळी काँग्रेसचे अन्य नगरसेवक , पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने गर्दी करून जमले होते . विशेष म्हणजे मुझफ्फर सह नगरसेवक , पदाधिकारी , कार्यकतें आदींनी मास्क घातला नव्हता व शाररिक अंतर राखले नव्हते .
नया नगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी महेशकुमार पाटील यांना सदर उदघाटनाची कार्यक्रम होणार असल्याची माहिती मिळाल्या नंतर सायंकाळी ते व चव्हाण असे पोलीस कर्मचारी गेले असता पोलीस आणि इत्तर प्राधिकारी यांची परवानगी घेतली नसल्याचे आढळून आले . तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आणि मास्क घातले नसल्याचे दिसुन आले . पोलिसांच्या मनाई आदेशचे सुद्धा उल्लंघन केले गेले . त्या अनुषंगाने पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी इनामदार सह कार्यकर्त्यांवर विविध कायदे - नियमातील कलमा खाली गुन्हा दाखल केला आहे .