ठाणे : पोलीस वसाहतीमधील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जयपाल परदेशी (२८) या सुरक्षा रक्षकाला ठाणेनगर पोलीसांनी अटक केली. त्याची पत्नी महिला पोलीस आहे. त्याला ३१ आॅक्टोंबरपर्यत पोलीस कोठडी दिली. या मुलीची आजी नौपाडा पोलीस ठाण्यात साफसफाईचे काम करते. त्यामुळे तिची ओळख याच पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीसाशी झाली. या महिला पोलिसाने या मुलीला शिक्षणासाठी घरी आणले. त्यामुळे ती आयुक्तालयाच्या बाजूला असलेल्या वसाहतीमध्येच पोलीस कुटुंबासमवेत रहात होती. २४ आॅक्टोंबरला रात्री ११ वा. आणि २६ आॅक्टोंबरला सकाळी घरातच पोलीस महिलेचा पती जयपालने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकाराची कुठेही वाच्यता न करण्याची धमकीही त्याने दिली होती. तरीही घडला प्रकार मुलीने वसाहतीमधील काही महिलांना सांगितला. या महिलांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणल्यानंतर ठाणेनगर पोलीसांनी मंगळवारी पहाटे त्याला अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा वायदंडे या याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
पोलिसाच्या पतीचा मुलीवर अत्याचार
By admin | Published: October 28, 2015 11:09 PM