कल्याण : ठाणे पालिसांनी प्रतिष्ठेच्या बनवलेल्या सोनसाखळी चोरी प्रकरणात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला आंबिवलीत जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. इराणी वस्तीत ही घटना घडली. तेथे यापूर्वीही पोलिसांवर हल्ले झाले आहेत. तरीही पोलीस पुरेशा फौजफाट्यासह आणि महिला हल्ले करत असूनही पुरेसे महिला कर्मचारी न घेता गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. इराणी वस्तीतील महिलांनी मात्र पोलिसांचा दावा पेटाळून लावला असून पोलिसावर नव्हे, तर स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेतल्याचे म्हटले आहे. तसेच जी व्यक्ती गेले पाच महिने आजारपणामुळे अंथरूणात आहे, ती सोनसाखळ््या कशी चोरू शकते, असा प्रश्न त्याची आई ममिया हिने केला.पोलिसावर रॉकेल टाकल्याचा आरोप असलेली महिला आरोपीची भाची आहे, तर या घटनेतून बचावलेल्या पोलिसाचे नाव दाजी गायकवाड असे आहे. या घटनेमुळे पोलिसांवर कारवाई न करताच परतण्याची वेळ आली. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात आरोपी समीर इराणीची अल्पवयीन भाची मुख्य आरोपी असून अन्य महिलांची नावेही त्यात आहेत. पोलिसावर प्राणघातक हल्ला करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे या कलमाखाली गुन्हे दाखल आहे. उल्हासनगर पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार सोनसाखळी चोरीप्रकरणी आरोपी समीर इराणीला शोधण्यासाठी २० पोलिसांचा ताफा शुक्रवारी इराणी वस्तीत शिरला. तो या वस्तीत लपून बसल्याची माहिती पोलिसांकडे होती. त्यांनी वस्तीवर छापा टाकताच महिलांनी प्रचंड विरोध केला. आरोपीच्या अल्पवयीन भाचीने कारवाईला विरोध करत इराणी महिला गोळा केल्या. त्यांनी पोलिसांशी झटापट सुरु केली. काही महिलांनी पोलिसांना मारहाण केली. त्यांना ओरबाडण्यास सुरुवात केली. त्याला पोलिस प्रतिकार करीत होते. पण हल्ला चढविणाऱ्या महिला असल्याने पुरुष पोलिसांना हवा तसा प्रतिकार करता येत नव्हता. या झटापटीत आरोपीच्या भाचीने २० लीटर रॉकेलचा कॅन आणला आणि तो गायकवाड या पोलिसाच्या अंगावर ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तेव्हा पोलिसांनी जोरदार प्रतिकार केल्याने गायकवाड यांचा जीव वाचल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र आरोपीला न पकडता पोलिसांना हात हलवत परतावे लागले. समीरच्या अल्पवयीन भाचीने रॉकेल ओतल्याचा आरोप फेटाळला. पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ भाचीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेतले होते. पोलिसांच्या अंगावर रॉकेल टाकलेच नाही. पोलिसांनी तसा कांगावा केल्याचे ममिया यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)वस्तीबद्दल आधीही तक्रारीइराणी वस्तीत यापूर्वीही पोलिसांवर दगडफेक झाली आहे. कारवाईदरम्यान दोन पोलिसांच्या हाताला महिलांनी चावा घेतल्याने त्यांना याआधीही कारवाई सोडून पळ काढावा लागला होता. या वस्तीमुळे आंबिवली परिसरातील जनजीवन असुरक्षित असल्याचे सांगत ही वस्ती हलविण्याची मागणी २०१२ मध्ये सेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी केली होती. गृह खात्याकडेही अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दास नावाच्या रेल्वे प्रवाशावर याच वस्तीजवळ चालत्या गाडीत हल्ला झाला होता. त्यात तो चालत्या गाडीतून पडून जखमी झाला होता.
पोलिसाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
By admin | Published: April 10, 2017 5:53 AM