- पंकज पाटीलअंबरनाथ : अंबरनाथमधील कल्याण-बदलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी हा सर्वांसाठी त्रासदायक प्रकार ठरत आहे. सर्वाधिक कोंडी ही पोलीस स्टेशन चौकातच होते. ज्या चौकात ही कोंडी होते, त्या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला पोलिसांचीच वाहने बेकायदा उभी केली जातात. या वाहनांमुळेच या ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. या अरुंद रस्त्यामुळेच मोठी कोंडी या भागात होते. मात्र, ही कोंडी सोडवण्यासाठी स्थानिक पोलीस मात्र आपली वाहने हलवत नाही, हीच मोठी अडचण झाली आहे.अंबरनाथ पोलीस ठाणे हे कल्याण-बदलापूर रस्त्यावरच आहे. या पोलीस ठाण्याच्या बाहेर रस्त्याच्या चौथ्या लेनवर पोलिसांची वाहने चुकीच्या पद्धतीने उभी केली जातात. पोलीस स्टेशन चौकात सर्वाधिक वाहतूककोंडी होत असतानाही ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागते. या पोलीस स्टेशनसमोरच असलेल्या रस्त्यावर खड्डेही असल्याने त्या ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने जाते. गेल्या काही दिवसांत या भागातील रस्ते दुरुस्त करण्यात आलेले असले, तरी अजूनही बेकायदा पार्किंग आणि रस्त्याच्या आड करण्यात आलेले पार्किंग यावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. वाहतूककोंडीला अडथळा होत असतानाही वाहतूक पोलीस या रस्त्यावरील वाहनांवर कारवाई करत नाही.कायद्यावर बोट ठेवून नागरिकांकडून दंड वसूल करणाऱ्या पोलिसांची शिस्त त्यांच्याच कार्यालयाबाहेर दिसते. पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वाहनेही पोलीस स्टेशनच्या बाहेरील रस्त्यावर उभी करतात. पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला जागा असतानाही सर्व वाहने ही थेट रस्त्याच्या आड उभी करण्यात येतात. दिवसरात्र या गाड्या तेथेच उभ्या राहत असल्याने या ठिकाणी वाहतुकीचा रस्ता हा अरुंद झाला आहे. कल्याण-बदलापूर रस्त्याचे तीनपदरी काम झाले असून चौथ्या मार्गाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. मात्र, या मार्गावरून कोंडीच्यावेळी वाहने सोडणे सोयीचे होते. असे असतानाही याच मार्गावर पोलिसांची वाहने उभी केली जातात. कायमस्वरूपी ही वाहने त्या ठिकाणी राहत असल्याने वाहतूककोंडीचा त्रास वाढत आहे. अपघातग्रस्त वाहने आणि जप्त केलेली वाहनेही येथे ठेवतात.गॅरेज व्यावसायिकांमुळेही अडथळा येत आहेवाहतूककोंडीला जबाबदार असणारे दुसरे कारण म्हणजे रस्त्यावर असलेले गॅरेज व्यावसायिक. अंबरनाथ पोलीस ठाण्यासमोरच असलेल्या गॅरेज व्यावसायिकांची सर्व वाहने ही रस्त्यावर उभी राहत असतात. त्यामुळे वाहतुकीला मार्ग अपुरा पडतो. हीच अवस्था दुकानदारांनीही केली आहे. कल्याण-बदलापूर रस्त्यावरील काही दुकानदारांनी आपले शोरूम दुकानाबाहेरच थाटले आहे. त्यानंतर, त्याच दुकानांच्या समोर खाजगी पार्किंग केले आहे. त्यामुळे त्याचाही त्रास वाहतूकव्यवस्था सुरळीत करण्यात येतो.
पोलिसांच्या वाहनांनीच चक्क अडवला रस्ता, कायद्याच्या रक्षकांकडूनच नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 1:13 AM