ठाणे : वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करून दहा हजारांपेक्षा अधिक दंड थकविणाऱ्या रगेल वाहनचालकांच्या दंड वसुलीसाठी ठाणे शहर वाहतूक शाखेने आता विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे अशा वाहनमालकाच्या घरी जाऊन त्याला नोटीस बजावून वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत समुपदेशनही केले जाणार आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर फेब्रुवारी २०१९ पासून ई-चालान प्रक्रियेद्वारे दंड आकारला जात आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ दरम्यान प्रलंबित ई-चालानसंदर्भात ठाणे शहर वाहतूक शाखेने १८ उपविभागांमार्फत पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने विशेष मोहीम राबविली. यामुळे अगदी सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनीही आपल्या थकीत दंडाचा भरणा केला. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांमध्ये ठाणे वाहतूक शाखेने सहा कोटी २५ लाख रुपये वसूल करून ते शासनाकडे जमा केले होते.
सध्या सामान्य नागरिकांसाठी उपनगरी रेल्वेसेवा बंद असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. यातूनच वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. काही निर्ढावलेल्या वाहनचालकांनी वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध दहा हजारांपेक्षा जास्त दंड प्रलंबित आहे. अशा बेदरकार चालकांचा प्रलंबित दंड वसुलीसाठीच ही विशेष दंड वसुली मोहीम सुरू केल्याचे पाटील यांनी सांगितले. यामध्ये ठाणे आणि कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी झालेली वाहने आहेत. यात एमएच ०४ (ठाणे) ही तीन हजार १०५, तर एमएच ०५ (कल्याण) या नोंदणीची ३४६ अशा एकूण तीन हजार ४५१ वाहनांवर दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक दंड प्रलंबित आहे. त्यापैकी एक हजार २६९ वाहनमालक हे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील रहिवाशी आहेत.
* ज्या एक हजार २६९ वाहनधारकांचे पत्ते ठाणे आयुक्तालयातील आहेत, त्यांचे वाहतूक उपविभागनिहाय वर्गीकरण केले आहे. संबंधित वाहनमालकांच्या घरी प्रलंबित दंडाची रक्कम भरण्याबाबतची नोटीस घेऊन आता वाहतूक शाखेचा कर्मचारी धडकणार आहे.
* अनेक वाहनमालकांना त्यांच्या वाहनावर प्रलंबित चालान माहीत नसते. काहींना याची माहिती असूनही ते पुन्हा वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. वरीलपैकी दंड न भरण्याच्या कारणांची माहिती वाहतूक शाखेचा हा कर्मचारी घेणार आहे. त्याचवेळी नोटीसही तो बजावून दंडाची रक्कमही तो तत्काळ वसूल करणार आहे.
* ऑनलाइनही भरता येणार दंडाची रक्कम
थकीत दंडाची रक्कम ऑनलाइनद्वारे वाहतूक पोलिसांच्या संकेतस्थळावर किंवा पेटीएम अॅप किंवा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याकडीत ई-चालान मशीनवर अथवा जवळच्या वाहतूक चौकीवरही प्रत्यक्ष जाऊन भरावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.